इस्रायल-हमास युद्धबंदीची घोषणा, मात्र अखेरच्या टप्प्यात पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:25 IST2025-01-17T07:25:00+5:302025-01-17T07:25:41+5:30
कैद्यांच्या सुटकेवरून शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात बाधा निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.

इस्रायल-हमास युद्धबंदीची घोषणा, मात्र अखेरच्या टप्प्यात पेच
दोहा/जेरुसलेम : १५ महिन्यांपासून पॅलेस्टाईनच्या गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षावर तोडगा अंतिम टप्प्यात असल्याचे या दोन्ही देशांत मध्यस्थी करणाऱ्या कतार व अमेरिकेने बुधवारी जाहीर केले आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी एक सुवर्णमध्य मान्य केला असला तरीही हा करार अद्याप पूर्ण झाला नसल्याचे सांगून याला अंतिम रूप दिले जात असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे. कैद्यांच्या सुटकेवरून शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात बाधा निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
जोवर ३३ इस्रायली नागरिकांच्या सुटकेबाबत हमास स्पष्ट भूमिका घेत नाही आणि त्यांच्या जीविताबाबत माहिती मिळत नाही तोवर या युद्धबंदी कराराला इस्रायली संसद मंजुरी देणार नाही, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांत युद्धबंदी कराराची ही प्रक्रिया सुरू असतानाच गाझामध्ये इस्रायली हल्ल्यात ७२ लोक ठार झाले. दरम्यान, कतार-अमेरिकेने युद्धबंदी कराराची घोषणा करताच जगभरातून याचे स्वागत सुरू झाले आहे.
करारात आहेत हे मुद्दे
हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली ओलिसांची टप्प्याटप्प्याने सुटका करावी.
इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका व हजारो विस्थापितांना गाझामध्ये परतण्याची परवानगी देणे.
या भागात आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी मार्ग खुला करणे.
इस्रायलची भूमिका...
जोवर हमास आपली हटवादी भूमिका सोडत नाही तोवर कराराला इस्रायली संसद मंजुरी देणार नाही.
५०,००० पेक्षा अधिक बळी या युद्धात १५ महिन्यांत गेले आहेत. या युद्धात प्रामुख्याने लहान मुले, महिलांचा मृत्यू अधिक झाला आहे.