ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 08:46 IST2025-10-29T08:46:17+5:302025-10-29T08:46:38+5:30
Israel Gaza Ceasefire Violation: गाझा पट्टीत लागू असलेला युद्धविराम धोक्यात. हमासच्या कथित हल्ल्यानंतर इस्त्रायली सैन्याने पुन्हा हवाई हल्ले केले. नेतन्याहू यांनी 'तगड्या' हल्ल्याचा आदेश दिला, वाचा सविस्तर.

ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
मध्यस्थांनी घडवलेला युद्धविराम गाझा पट्टीमध्ये पुन्हा संकटात आला असून, मंगळवारी (२९ ऑक्टोबर २०२५) इस्त्रायलने युद्धबंदी लागू असतानाही गाझात हवाई हल्ले केले. हमासच्या सैनिकांनी इस्त्रायली सैन्यावर गोळीबार करून अमेरिका-मध्यस्थी केलेला युद्धविराम तोडल्याचा आरोप गाझा येथील नागरी संरक्षण संस्थेने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझा शहरात एका घरावर झालेल्या हल्ल्यात किमान दोन लोकांचा मृत्यू झाला, तर इतर हल्ल्यांमध्ये १८हून अधिक लोक मारले गेले. या हल्ल्यांनंतर रात्रभर इस्त्रायली रणगाड्यांच्या तोफांनी गाझा दणाणून गेला होता.
नेतन्याहू यांचा आदेश
दक्षिणी गाझात इस्त्रायली फौजांवर झालेल्या गोळीबारानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी लष्कराला गाझावर तत्काळ 'मोठे हल्ले' करण्याचे आदेश दिले. हमासने ओलिसांचे अवशेष परत न करून आणि सैन्यावर हल्ला करून कराराचे उल्लंघन केले आहे, असे नेतन्याहू यांचे प्रवक्ते डेव्हिड मेंसर यांनी स्पष्ट केले.
परस्पर आरोप-प्रत्यारोप
या घटनेनंतर इस्त्रायल आणि हमास या दोघांनीही एकमेकांवर युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या २०-सूत्रीय योजनेनुसार १० ऑक्टोबर रोजी प्रभावी झालेला हा युद्धविराम आता संकटात आला आहे. हमासने एका ओलिसाचा मृतदेह परत मिळवल्याचे सांगितले असले तरी, इस्त्रायलच्या हल्ल्याच्या घोषणेनंतर मृतदेह सोपवण्याची योजना थांबवल्याचे हमासने स्पष्ट केले.