हमासची 2200 ठिकाणं उद्ध्वस्त, 900 ठार; मास्टरमाइंड डायफच्या वडिलांच्या घरावर बॉम्बस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 08:58 IST2023-10-11T08:56:46+5:302023-10-11T08:58:03+5:30
Israel-Hamas conflict: इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलने आतापर्यंत हमासच्या 2200 हून अधिक ठिकाणांना टार्गेट केलं आहे. या

हमासची 2200 ठिकाणं उद्ध्वस्त, 900 ठार; मास्टरमाइंड डायफच्या वडिलांच्या घरावर बॉम्बस्फोट
इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटना यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलने आतापर्यंत हमासच्या 2200 हून अधिक ठिकाणांना टार्गेट केलं आहे. याशिवाय इस्रायलच्या हवाई दलाने हमासचे लष्करी प्रमुख मोहम्मद डायफ यांच्या वडिलांचं घरही उद्ध्वस्त केलं. डायफ हा इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 900 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्त्रायली सैन्याने आपल्या भागात 1500 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील हे युद्ध हमासच्या हल्ल्याने सुरू झाले. हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागले. याशिवाय हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले होते आणि त्यांनी नि:शस्त्र इस्रायलींवर क्रूर हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल हमासच्या ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे.
इस्रायलच्या सततच्या गोळीबारामुळे 20 लाख लोकसंख्या असलेला गाझाच्या इमारती आता कब्रस्तान बनू लागला आहे. सर्वत्र केवळ ढिगारा आणि धूर दिसत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनच्या 900 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 260 मुलं आणि 200 महिलांचा समावेश आहे. त्याच वेळी, 4,250 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलवर हमासच्या धक्कादायक हल्ल्यामागे मोहम्मद डायफ हा मास्टरमाईंड असल्याचं बोललं जात आहे. डायफ हा हमासच्या लष्करी शाखेचा प्रमुख कमांडर आहे.
हमाससोबतच्या युद्धात इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा मिळाला आहे. अमेरिकेने सर्वप्रथम पुढे येऊन आपली शस्त्रे, दारूगोळा आणि सैनिक इस्रायलला पाठवले. अमेरिकन सुसज्ज विमाने आणि जेराल्ड आर फोर्ड युद्धनौका इस्रायलच्या जवळ पोहोचल्या आहेत. युद्धामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.