गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:53 IST2025-08-25T17:51:59+5:302025-08-25T17:53:01+5:30
नासिर रुग्णालयाने दिलेल्या निवेदनानुसार, या हल्ल्यात अनेक पत्रकार बळी पडले असून, मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत.

गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध
इस्त्रायलने आज पॅलेस्टाईनवर मोठा हल्ला केला असून, गाझामधील नासिर मेडिकल कॉम्प्लेक्सला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात चार पत्रकारांसह एकूण १४ लोक ठार झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ठार झालेल्या पत्रकारांमध्ये 'अल जझीरा' या नामांकित वृत्तसंस्थेच्या एका कॅमेरामनचा समावेश असल्याची पुष्टी कतारच्या वृत्त वाहिनीने केली आहे.
नासिर रुग्णालयाने दिलेल्या निवेदनानुसार, या हल्ल्यात अनेक पत्रकार बळी पडले असून, मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. ठार झालेल्या पत्रकारांमध्ये अल जझीराचे कॅमेरामन मोहम्मद सलाम, रॉयटर्ससाठी काम करणारे हुसम अल-मासरी, आणि एपीशी संबंधित मरियम अबू डग्गा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, एक फ्रीलान्स पत्रकार आणि गाझाच्या सिव्हिल डिफेन्स संघटनेचा एक सदस्यही या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे.
रुग्णालयाच्या चौथ्या आणि दुसऱ्या मजल्यावर हल्ला
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने केलेल्या पहिल्या हल्ल्यात रुग्णालयाच्या चौथ्या मजल्याला लक्ष्य केले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा हल्ला करून दुसऱ्या मजल्यालाही निशाणा बनवले. या हल्ल्यांमुळे रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीत भीतीचे वातावरण पसरले होते आणि सर्वत्र धुराचे लोट दिसत होते.
इस्त्रायलवर जगभरातून टीका
इस्त्रायलच्या या हल्ल्याची जगभरातून निंदा केली जात आहे. काही दिवसांपूर्वीही इस्त्रायलने असाच हल्ला केला होता, ज्यात अनेक पत्रकार मारले गेले होते. त्या वेळी इस्त्रायलने असा आरोप केला होता की, ज्या अल जझीराच्या पत्रकाराचा मृत्यू झाला, तो हमाससाठी काम करत होता आणि त्यांच्याकडून पगारही घेत होता. सध्याच्या हल्ल्याबाबत इस्त्रायली सैन्याने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.