गाझामध्ये इस्रायलचा हल्ला; नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यासाठी ४८ तासांचा कॉरिडॉर खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:30 IST2025-09-17T15:28:11+5:302025-09-17T15:30:08+5:30
इस्रायलने गाझा शहरातील नागरिकांना जीव वाचवता यावा यासाठी एक तात्पुरता मार्ग खुला केल्याची घोषणा बुधवारी केली आहे.

गाझामध्ये इस्रायलचा हल्ला; नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यासाठी ४८ तासांचा कॉरिडॉर खुला
इस्रायलने गाझा शहरातील नागरिकांना जीव वाचवण्यासाठी पळ काढता यावा यासाठी एक तात्पुरता मार्ग खुला केल्याची घोषणा बुधवारी केली आहे. इस्रायली सैन्य जोरदार बॉम्बहल्ला करत गाझामध्ये आणखी आतपर्यंत शिरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सैन्याचे प्रवक्ते अविचाय अद्रई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलाहा अल-दीन स्ट्रीटवरील हा मार्ग फक्त ४८ तासांसाठी खुला राहणार आहे. त्यांनी नागरिकांना दक्षिणेकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. इस्रायली सैन्य अधिकृतपणे गाझा शहरात घुसले असून, हमासच्या सैन्याचा बालेकिल्ला असलेल्या भागावर हल्ला तीव्र झाला आहे.
गाझा शहरावर इस्रायलने मंगळवारी हल्ला सुरू केला असून, सैनिक युद्धग्रस्त भागातील सर्वात मोठ्या नागरी वस्तीत पुढे सरकत आहेत. शहराचा बहुतेक भाग गेल्या काही आठवड्यांच्या बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त झाला असून, हजारो लोक आपल्या सामानासह वाहनांमधून पळ काढत आहेत, तर लाखो लोक अजूनही तिथे अडकले आहेत.
लष्करी कारवाई अनेक महिने चालण्याची शक्यता
इस्रायली सैन्याने या मोहिमेसाठी कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही. हमासचे लष्करी तळ नष्ट करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, ही कारवाई अनेक महिने चालू शकते.
याच दबावादरम्यान, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या एका अहवालात इस्रायलवर गाझामध्ये नरसंहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. इस्रायलने मात्र हा अहवाल चुकीचा आणि खोटा असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे. संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी 'गाझा जळत आहे' असे म्हटले आहे.
गाझाच्या समुद्रकिनाऱ्यावरील रस्त्यावर गाद्या आणि इतर सामानांनी भरलेल्या गाड्यांची आणि ट्रकची लांबच लांब रांग लागली आहे. लोक लवकरात लवकर आपली घरे सोडून पळ काढत आहेत, तर काही जण पायी चालत निघाले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान इशारा दिला आहे की, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून मध्य पूर्वेला अस्थिर करणाऱ्या या संघर्षाला थांबवण्यासाठी आता फार कमी वेळ शिल्लक राहिला आहे.