ड्रग्ज माफियांचा काळ जवळ आला? मेक्सिको आणि कोलंबियाला ट्रम्प यांची उघडपणे धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 18:03 IST2026-01-04T18:03:12+5:302026-01-04T18:03:25+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत दहशतीचे वातावरण पसरले असून, ट्रम्प यांनी आता इतर शेजारील देशांनाही उघडपणे धमकावण्यास सुरुवात केली आहे.

ड्रग्ज माफियांचा काळ जवळ आला? मेक्सिको आणि कोलंबियाला ट्रम्प यांची उघडपणे धमकी
जागतिक राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठी लष्करी कारवाई करत तिथले राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे. अमेरिकन हवाई दलाने केलेल्या या कारवाईनंतर मादुरो यांना थेट न्यूयॉर्कमधील तुरुंगात डांबण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत दहशतीचे वातावरण पसरले असून, ट्रम्प यांनी आता इतर शेजारील देशांनाही उघडपणे धमकावण्यास सुरुवात केली आहे.
सत्ता आता अमेरिकेच्या हाती!
व्हेनेझुएलामध्ये सत्तापालट केल्यानंतर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत तिथे सुरक्षित आणि कायदेशीर सत्तांतर होत नाही, तोपर्यंत अमेरिकाच वेनेझुएलाचा कारभार पाहणार आहे. "आम्ही या देशाचे रक्षण करू आणि तिथल्या तेल साठ्यांचा वापर अमेरिकेच्या हितासाठी करू," असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले. या कारवाईमुळे वेनेझुएलातील तेल पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी अमेरिका अब्जावधी डॉलर्स खर्च करणार आहे.
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांना उघड धमकी
मादुरो यांच्या अटकेचा निषेध करणाऱ्या कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना ट्रम्प यांनी थेट इशारा दिला आहे. "पेट्रो हे कोकेन बनवून अमेरिकेत पाठवत आहेत, त्यांनी सावध राहावे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी त्यांना सुनावले. कोलंबियातील ड्रग्ज लॅब उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका तिथेही लष्करी कारवाई करू शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.
मेक्सिको आणि क्यूबाही निशाण्यावर?
केवळ व्हेनेझुएला किंवा कोलंबियाच नाही, तर मेक्सिको आणि क्यूबाबाबतही ट्रम्प प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शाइनबाम यांचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले की, "त्या चांगल्या महिला आहेत, पण मेक्सिको त्या नाही तर ड्रग्ज कार्टेल चालवत आहेत." दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी क्यूबाच्या सरकारलाही इशारा दिला असून, "हवानामध्ये बसलेल्या नेत्यांनी आता चिंतेत राहण्याची वेळ आली आहे," असे म्हटले आहे.
मारिया कोरिना मचाडो यांना मोठा धक्का
व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना अमेरिकेचा पाठिंबा मिळेल अशी चर्चा होती. मात्र, ट्रम्प यांनी धक्कादायक विधान करत म्हटले की, मचाडो यांना देशांतर्गत मान-सन्मान नाही, त्यामुळे त्या नेतृत्व करू शकत नाहीत. त्याऐवजी ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.