असेही असते का...? दुबईत ११५ एवढ्या कमी वेगाने कार चालविली, आठ चलन आली; मग MAX Speed किती असेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:53 IST2024-12-05T10:53:32+5:302024-12-05T10:53:52+5:30
DUBAI Max Speed: दुबईतील रस्त्यावरचा हा वेग एवढा कमी आहे की तो भारतातील एक्स्प्रेस हायवेंवरचा सर्वाधिक स्पीड आहे. एवढ्या वेगाने कार चालवूनही या व्यक्तीला कमी वेगात चालवत असल्याचा दंड भरावा लागला आहे.

असेही असते का...? दुबईत ११५ एवढ्या कमी वेगाने कार चालविली, आठ चलन आली; मग MAX Speed किती असेल...
भारतात भरधाव वेगात गाडी चालविल्याचाच तेवढा दंड आकारला जातो. परंतू दुबईमध्ये कमी वेगाने गाडी चालविल्यावरही दंड आकारला जात आहे. युएईमध्ये दुबईहून अबुधाबीला जाणाऱ्या एका व्यक्तीला कमी वेगाने तो पण 110-115 किमी प्रति तास एवढ्या वेगाने गाडी चालविल्यावरून आठवेळा दंड करण्यात आला आहे. या व्यक्तीने सोशल मीडियावर याची माहिती देताच त्यालाच अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.
दुबईतील रस्त्यावरचा हा वेग एवढा कमी आहे की तो भारतातील एक्स्प्रेस हायवेंवरचा सर्वाधिक स्पीड आहे. एवढ्या वेगाने कार चालवूनही या व्यक्तीला कमी वेगात चालवत असल्याचा दंड भरावा लागला आहे. रेडिटवर या व्यक्तीने पोस्ट केली आहे.
या दंडाचा स्क्रीनशॉट या व्यक्तीने पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने आपल्याला या नियमाची माहिती नव्हती, असे सांगितले आहे. दुबईमध्ये ठराविक वेगापेक्षा जास्त आणि ठराविक वेगापेक्षा कमी वेगाने वाहन चालविले तर दंड आहे. कमी वेगाने वाहन चालविल्याकर दंड कसा काय घेतला जातो असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
आपल्याकडे सहसा हा नियम पाळला जात नाही किंवा या गोष्टीचा विचारही केला जात नाही. परंतू एक्स्प्रेस वेवरील आतील जी पहिली लेन असले तिचा स्पीड १०० ते १२० असा असतो. यापेक्षा कमी वेगाने वाहन चालविले तर मागून त्या वेगात येणाऱ्या वाहनांना अडथळा होतो. आपल्याकडे या गोष्टीचा विचार केला जात नसला तरी परदेशात मात्र ही गोष्ट काटेकोरपणे पाळली जाते. नेमकी हीच चूक या व्यक्तीने केली आहे.
हा व्यक्ती सकाळी अबुधाबीला गेला आणि सायंकाळी पुन्हा दुबईला परतला. त्याच्या दाव्यानुसार कमी वेगाने गाडी चालविण्यावरील बंधने कुठेही लिहिण्यात आली नव्हती. दुबईहून निघताना पहिला दंड आकारला गेला तेव्हा आपल्याला सूचितही करण्यात आले नाही. दुसऱ्या दिवशी त्याला याची माहिती मोबाईलवर मेसेजद्वारे मिळाली. आठ चलन त्याला पाठविण्यात आली असून जर माहिती मिळाली असती तर मी येतेवेळी सावध झालो असतो, अशी त्याची तक्रार आहे.
वाचकांच्या माहितीसाठी अबू धाबीमधील शेख मोहम्मद बिन रशीद रोडवरील डाव्या बाजूच्या पहिल्या दोन लेनसाठी किमान वेग मर्यादा 120 किलोमीटर प्रति तास (kph) आहे. आणि कमाल वेग मर्यादा १४० किमी प्रतितास आहे. जे ड्रायव्हर्स किमान वेग मर्यादेपेक्षा कमी वाहन चालवताना आढळतात त्यांना AED400 म्हणजेच 9227.79 रुपये दंड आकारला जातो.