दुबई : इराण आणि अमेरिका-इस्रायलदरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी इराणने कुवेतमधील ‘मिना अल-अहमदी’ तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला. तर इराणमध्ये पवित्र सण नवरोज साजरा होत असताना इस्रायलने तेहरानवर तुफान बॉम्बहल्ले केले. इस्रायलमध्येही इराणच्या हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यांमुळे सायरन वाजले. जेरुसलेम आणि उत्तरेकडील भागात हल्ले झाले. या हल्ल्यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी शत्रूंना नेस्तनाबूत करणे व त्यांचे संरक्षण हटवण्याची वेळ आली असल्याचा गर्भित इशारा दिला.
कुवेत सरकारच्या माहितीनुसार, इराणकडून ‘मिना अल-अहमदी’ या अत्यंत महत्त्वाच्या रिफायनरीवर दोन टप्प्यांत ड्रोन हल्ले झाले. या हल्ल्यांत प्रकल्पात आग लागली असून ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दररोज सुमारे ७.३ लाख बॅरल तेल प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प कुवेतच्या तीन प्रमुख रिफायनरींपैकी एक आहे. विशेष म्हणजे, याच प्रकल्पावर गुरुवारीही हल्ला झाला होता. इस्रायलने इराणच्या ‘साउथ पार्स’ या जगातील सर्वांत मोठ्या वायू क्षेत्रावर हल्ला केल्यानंतर इराणने आखाती देशांतील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. साऊथ पार्स हे इराणसाठी अत्यंत महत्त्वाचे तेल उत्पादन व तेलशुद्धीकरण केंद्र आहे.
हवाई हल्ल्यात इराणच्या युद्ध प्रवक्त्याचा मृत्यू - इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने युद्धाच्या पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्र निर्मिती सुरू असल्याचा ठाम दावा करत संघर्ष दीर्घकाळ चालणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, हा दावा करणारे प्रवक्ते जनरल अली मोहम्मद नाएनी यांचा काही वेळातच इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली.
जनरल नाएनी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या इराणची क्षेपणास्त्र क्षमता संपुष्टात आली आहे, या दाव्याला फेटाळून लावत, युद्धस्थितीतही आम्ही क्षेपणास्त्रांची निर्मिती करत आहोत आणि साठा करण्यास कोणतीही अडचण नाही, असे स्पष्ट केले होते. शत्रू पूर्णपणे थकून जाईपर्यंत हे युद्ध सुरू राहील आणि देशावरचे युद्धाचे सावट दूर झाल्यावरच ते संपेल, असे ते म्हणाले होते. मात्र, या विधानानंतर काही वेळातच हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. दरम्यान दुबई सरकारने इराणी हॉस्पिटल, इराणी क्लब बंद केले आहेत.
अल-अक्सा मशीद बंद -युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल सरकारने शहरातील प्रसिद्ध अल-अक्सा मशीद परिसर ईदच्या नमाजासाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. १९६७ मध्ये इस्रायल विरुद्ध अरब देशांमध्ये पेटलेल्या सहा दिवसांच्या युद्धात ही मशीद बंद करण्यात आली होती.
दुबई, सौदीत तणाव -दुबईमध्ये क्षेपणास्त्रे अडवताना मोठे स्फोट झाले. ही घटना ईद-उल-फित्रच्या दिवशी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बहरिनमध्ये क्षेपणास्त्रांच्या तुकड्यांमुळे एका गोदामाला आग लागली, तर सौदीने पूर्वेकडील तेलसमृद्ध भागावर लक्ष्य करणारे अनेक ड्रोन पाडली.
युद्ध आमच्यावर लादले गेले -लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हस्तक्षेप करून युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. लेबनॉनला या युद्धात ओढले गेले असून देश युद्धभूमी बनला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. हे युद्ध आम्ही निवडलेले नाही, ते आमच्यावर लादले गेले आहे. आता युद्धविराम आणि चर्चेद्वारे तोडगा काढण्याची गरज आहे, असेही नवाफ सलाम म्हणाले.
Web Summary : Iran attacked Kuwait's oil refinery, while Tehran faced bombings during Nowruz. Israel retaliated, heightening regional tensions. The conflict extended to Dubai with missile strikes on Eid. Calls for ceasefire and dialogue rise amidst escalating war.
Web Summary : ईरान ने कुवैत के तेल रिफाइनरी पर हमला किया, जबकि तेहरान में नवरोज़ के दौरान बमबारी हुई। इज़राइल ने जवाबी कार्रवाई की, जिससे क्षेत्रीय तनाव बढ़ गया। ईद पर दुबई में मिसाइल हमलों से संघर्ष और बढ़ा। युद्धविराम की मांग उठी।