इस्रायली जहाजावर इराणचा कब्जा; भारताकडे येणाऱ्या जहाजावर १७ भारतीय नागरिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:07 AM2024-04-14T05:07:46+5:302024-04-14T05:08:36+5:30

Iran And Israel Issue: इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Iran seizes Israeli ship 17 Indian nationals on ship coming to India | इस्रायली जहाजावर इराणचा कब्जा; भारताकडे येणाऱ्या जहाजावर १७ भारतीय नागरिक 

इस्रायली जहाजावर इराणचा कब्जा; भारताकडे येणाऱ्या जहाजावर १७ भारतीय नागरिक 

दुबई: इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत इस्रायलशी संबंधित एक मालवाहू जहाज हवाई हल्ला करून जप्त केले. हे जहाज भारताकडे निघाले असून त्यावर १७ भारतीय नागरिक असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासाच्या इमारतीवर हल्ला केला होता. त्यात रिव्होल्युशनरी गार्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह १२ जण ठार झाले होते. त्याचा बदला म्हणून इराणने ही कारवाई केली असल्याचे मानले जात आहे. इस्रायल गाझापट्टीत मागील ६ महिन्यांपासून हमासविरुद्ध युद्ध लढत आहे. जहाजावरील भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्रीय मंत्रालयाने संबंधित यंत्रणांशी बोलणी सुरु केली आहेत. 

हेलिकॉप्टरच्या साहाय्याने कमांडो जहाजावर उतरले
- इराणची वृत्तसंस्था इरणाने सांगितले की, नौदल शाखेच्या विशेष दलांनी ही कारवाई केली. एका हेलिकॉप्टरचा वापर करून कमांडो जहाजावर उतरले. नंतर हे जहाज जप्त करण्यात आले. ब्रिटिश लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आमिराती बंदर शहर फुजैराहजवळ ओमानच्या खाडीत ही घटना घडली.
- इराणने केलेल्या या कारवाईचा एक व्हिडीओ ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला मिळाला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने कमांडो जहाजावर छापेमारी करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. 

जहाजाचे मालक कोण?
प्राप्त माहितीनुसार, पोर्तुगीज ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाचे नाव ‘एमएससी एरिस’ असे असून लंडनस्थित ‘झोडियाक मेरिटाइम’ या कंपनीशी ते संबंधित आहे. ही इस्रायली अब्जाधीश आयल ऑफेर यांच्या मालकीच्या ‘झोडियाक समूहा’तील एक कंपनी आहे.

Web Title: Iran seizes Israeli ship 17 Indian nationals on ship coming to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.