Iran made a big mistake - Donald Trump | इराणने मोठी चूक केली, अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने ट्रम्प संतप्त
इराणने मोठी चूक केली, अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने ट्रम्प संतप्त

वॉशिंग्टन - गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव आता कमालीचा वाढला आहे. दरम्यान, आज इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ड्रोन पाडून इराणने मोठी चूक केली आहे, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. 

अमेरिकेसोबतचा तणाव कायम असतानाच इराणने आज अमेरिकेचे एक शक्तिशाली ड्रोन होर्मुजजवळ पाडले होते. इराणच्या या कृत्यामुळे अमेरिकेचा तीळपापड झाला आहे. इराणच्या या कृत्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी ट्विट करून इराणला इशारा दिला आहे. इराणने एक मोठी चूक केली आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर अमेरिका इराणविरोधात कठोर कारवाई करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध आणि हल्लीच तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर आखाती क्षेत्रात तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने अमेरिका नाराज झाली आहे. 

 इराणच्या हवाई क्षेत्रात घुसलेल्या अमेरिकेच्या एका सर्विलान्स ड्रोनला पाडण्यात आले आहे, असे इराण्याचा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले होते. मात्र ही घटना आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात घडल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. 

 इराणने एमक्य्-4सी हे ट्रायटन विमान पाडून अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे. त्यातच अत्याधुनिक आणि शक्तिशाली असल्याचा दावा करण्यात येत असलेले ड्रोन इराणने पाडल्याने अमेरिकेवर नामुष्की ओढवली आहे. त्यामुळेच अमेरिकेचा अधिक तीळपापड झाला आहे.  


Web Title: Iran made a big mistake - Donald Trump
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.