अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाची व्याप्ती आता अधिकाधिक वाढत चालली आहे. आधी आखाती देशांना लक्ष्य केल्यानंतर आता इराणने अझरबैजानवर ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला आहे. इराणने ड्रोनद्वारे अझरबैजानमधील नखचिवन एअरपोर्टला लक्ष्य केले.
याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार अझरबैजानने इराणमधून करण्यात आलेल्या या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये नखचिवन ऑटोनॉमस रिपब्लिकला लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तसेच अनेक लोक जखमी झाले. अझरबैजान हा पाकिस्तानचा मित्र देश आहे. तसेच पाकिस्तानच्या समर्थनार्थ अझरबैजान भूमिका मांडत असतो.
इराणकडून अझरबैजानवप हा हल्ला ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास झाला. इराणमधून नखचिवनच्या दिशेने दोन ड्रोन डागण्यात आले, अशी माहिती अझरबैजानी अधिकाऱ्यांनी दिली. यापैकी एक ड्रोन नखचिवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीवर पडला. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान होऊन आग लागली. तर दुसरा ड्रोन शेखराबाद गावातील एका शाळेच्या इमारतीजवळ कोसळला.
अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तर विमानतळाच्या इमारतीचंही नुकसान झालं आहे. मात्र इराणने उचललेल्या या पावलामुळे या युद्धाची व्याप्ती आणखी वाढली आहे.