संयुक्त राष्ट्रांची एजन्सी आयओएम (International Organization for Migration) नुसार, गेल्या २४ जून ते ९ जुलै दरम्यान तब्बल ५०८४२६ अफगाण नागरिकांनी इराण-अफगाणिस्तान सीमा ओलांडली आहे. यांपैकी बहुतेक लोक हे, गेल्या अनेक वर्षांपासून इराणमध्ये राहत असलेले, कागदपत्रे नसलेले कामगार होते. हे पाऊल, मार्च २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या इराणी हद्दपारी धोरणांतर्गत (Iranian deportation policy), उचलण्यात आले आहे.
इस्रायलसोबतच्या संघर्षानंतर, इराणच्या हद्दपारी मोहीमेला वेग -इराण आणि इस्रायल यांच्यात 12 दिवस चाललेला संघर्ष नुकताच संपुष्टात आल्यानंर हे पाऊल उचलण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, काही अफगाण नागरिकांनी इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा दावा येथील स्थानिक सरकारी माध्यमांनी केला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि तज्ज्ञांनी या मोहिमेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून, ही एक प्रकारची सामूहिक शिक्षा असून राजकीय फायद्यासाठी दुबळ्या लोकसंख्येला बळीचा बकरा बनवण्या सारखे आहे, असे म्हटले आहे.
बॉर्डरवर गर्दी आणि असहाय्य मुले -इस्लाम काला बॉर्डर क्रॉसिंग (पश्चिम अफगाणिस्तान) वरून आलेल्या व्हिडिओमध्ये परतणाऱ्या हजारो अफगाणांची गर्दी दिसून आली आहे. मदत केंद्रे पूर्णपणे भरली आहेत आणि अनेक मुले त्यांच्या पालकांशिवाय आली आहेत. IOM च्या मिशन प्रमुख मिहयोंग पार्क यांनी CNN ला दिलेल्या माहितीनुसार, "हजारों लोख उन्हात उभे आहेत आणि हेरातमधील उष्णता अत्यंत तीव्र असते."
महत्वाचे म्हणजे, गेल्या आठवड्यात आमच्याकडे सुमारे ४०० मुले आले आहेत, जे आपल्या कुटुंबांपासून वेगळे झाले आहेत. ही फार मोठी संख्या आहे. तसेच, जुलैच्या पहिल्या आठवड्यातच २.५ लाख अफगाण नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे, जो २०२५ मधील सर्वात मोठा साप्ताहिक आकडा आहे, असेही त्या म्हणाल्या.