युक्रेनचे विमान चुकून पडल्याची इराणची कबुली; इराण सरकारचे निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 03:20 AM2020-01-12T03:20:04+5:302020-01-12T06:36:06+5:30

दोषींवर कडक कारवाई करा : युक्रेन

Iran confesses to plane missile in Ukraine; Statements of the Iranian Government | युक्रेनचे विमान चुकून पडल्याची इराणची कबुली; इराण सरकारचे निवेदन

युक्रेनचे विमान चुकून पडल्याची इराणची कबुली; इराण सरकारचे निवेदन

googlenewsNext

तेहरान : युक्रेनचे प्रवासी विमान चुकून पाडल्याची कबुली इराणने शनिवारी दिली आहे. हे विमान उड्डाण करीत असताना तेहरानजवळील लष्करी तळाच्या दिशेने अचानक वळल्याने ते पाडले गेले असावे, असेही इराणने म्हटले आहे.

तेहराननजिक बुधवारी युक्रेनचे विमान कोसळून १७६ प्रवासी ठार झाले होते. इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना बगदादजवळ ड्रोन हल्ला करून अमेरिकेने ठार केले. त्याचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर लगेचच युक्रेनचे विमान इराणमध्ये कोसळले. या सर्व घटनांनी मध्य पूर्वेमध्ये अत्यंत तणाव निर्माण झाला आहे.

युक्रेनचे विमान चुकून पाडल्याची कबुली इराणच्या लष्कराने दिल्यानंतर थोड्याच वेळात तशाच आशयाचे टष्ट्वीट त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी केले. युक्रेनचे प्रवासी विमान इराणने क्षेपणास्त्रांचा हल्ला करून पाडले, हे अमेरिका व इतर देशांनी पुराव्यानिशी याआधीच सिद्ध केले होते. मात्र, हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास इराण तयार होत नव्हता. मात्र, अखेर या कृत्याची कबुली देऊन हसन रुहानी यांनी सांगितले की, विमान दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या दुर्घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आमच्या देशाचे विमान पाडणाऱ्या दोषी व्यक्तींवर इराणने कडक कारवाई करावी, अशी मागणी युक्रेनने केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना इराणने भरपाई द्यावी, तसेच विमान पाडल्याबद्दल जाहीर माफी मागावी, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची इराणने चौकशी विनाविलंब पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.


इराणच्या हद्दीतील उड्डाणावर बंदी अमेरिकेकडून मागे
इराणच्या हवाई हद्दीतून आपल्या विमानांना उड्डाण करण्यावर घातलेली बंदी अमेरिकेने शुक्रवारी मागे घेतली. असाच निर्णय भारत दोन दिवसांत घेण्याची शक्यता आहे. इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर हल्ला केला होता. तेहरान येथे युक्रेनचे प्रवासी विमान इराणने क्षेपणास्त्र डागून पाडले होते. सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण, इराक, ओमान, पर्शियन आखाताच्या हवाई हद्दीतून आपल्या विमानांना उड्डाण करण्यास अमेरिकेच्या फेडरेशन एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) बंदी घातली होती. असाच निर्णय भारतानेही घेतला होता. एअर इंडियाची भारतातून युरोप, अमेरिकेला जाणारी विमाने गेले काही दिवस इराणची हवाई हद्द टाळून उड्डाण करत आहेत. त्यामुळे दिल्ली व मुंबईहून सुटलेल्या विमानांना इच्छित स्थळी पोहोचण्यास अनुक्रमे २० मिनिटे व ३० ते ४० मिनिटांचा उशीर होत आहे. मध्य पूर्वेतील तणाव लक्षात घेता खूप महत्त्वाचे काम नसल्यास इराकमध्ये सध्या जाऊ नये अशी सूचना भारताने आपल्या नागरिकांना केली होती. अमेरिका व इराणमधील तणाव आणखी न वाढल्यास इराणच्या हवाई हद्दीत आपल्या विमानांना उड्डाण करण्यावर घातलेली बंदी भारतही मागे घेण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या एफएएने घेतलेला एखादा निर्णय इतर देशांना बांधील नसतो. पण सुरक्षेच्या दृष्टीने या निर्णयाचे अनुकरण अन्य देशांकडून केले जाते. इराणच्या हवाई हद्दीतून आपल्या विमानांच्या उड्डाणांना बंदी करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्यावर तसाच निर्णय भारतानेही घेतला. इराणची हद्द वगळता बहरिन, दोहा, अबुधाबी, दुबई, शारजाह, मस्कत येथे अमेरिकेच्या विमानांची ये-जा सुरू होती.

Web Title: Iran confesses to plane missile in Ukraine; Statements of the Iranian Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.