चंद्रावर पाऊल ठेवलेल्या पहिल्या माणसाचं नाव म्हटलं की आपल्याला लगेचच निल अर्मस्ट्राँग यांचं नाव लक्षात येतं. पण, चंद्रावर पोहोचलेल्या दुसऱ्या माणसाचं नाव काय हे आपल्याला सांगता येणार नाही. बज एल्ड्रिन असं त्या व्यक्तीचं नाव असून त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी लग्न केलं आहे. बज यांनी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची सहकारी असलेल्या महिलेसोबतच जीवनगाठ बांधली. एल्ड्रिन यांनी १९६९ मध्ये अपोलो ११ मिशनद्वारे चंद्रावर पाऊल ठेवले होते.
मिशन अपोलो ११ अंतर्गत अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर पोहोचले होते, त्यापैकी बज एल्ड्रिन एक आहेत. एल्ड्रिन यांनी शनिवार पत्नी डॉ. एंका फॉर (६३) सोबतच्या लग्नाचे फोटो ट्विटवरुन शेअर केले आहेत. आम्ही दोघांनी कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे एका छोट्या समारंभात लग्नगाठ बांधली, असे कॅप्शनही त्यांनी दिले आहे. मी आणि माझं प्रेम डॉ. एन्का फॉर यांनी लग्न केलं आहे. एन्का या एल्ड्रिन्सपेक्षा ३० वर्षांनी लहान आहेत.
बज एल्ड्रिन यांचा यापूर्वी तीनवेळा घटस्फोट झाला आहे. ते अपोलो ११ मिशनच्या ३ जणांच्या पथकातील एकमात्र जिवंत व्यक्ती आहेत. नील आर्मस्ट्रांग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अंतराळवीर आहेत, तर एल्ड्रिन हे १९ मिनिटांनी त्यांच्यानंतर चंद्रावर पोहोचले होते. त्यामुळे, ते चंद्रावर पाऊल ठेवणार पृथ्वीतलावावरील दुसरे व्यक्ती ठरले आहेत.
दरम्यान, एल्ड्रिन यांनी लग्नाचे फोटो शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल मीडियातून नवीन जोडप्याचं अभिनंदन करत, त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. बज़ एल्ड्रिन हे १९७१ मध्ये नासामधून निवृत्त झाले. त्यानंतर, १९९८ मध्ये त्यांनी शेयरस्पेस फाउंडेशन नावाने एक स्वयंसेवी संस्था सुरू केली.