यंदा २५ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार इंटेल; आर्थिक संकटामुळे कर्मचारी कपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 10:39 IST2025-07-26T10:32:03+5:302025-07-26T10:39:33+5:30
चिप उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंटेल यंदा २५ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची माहिती आहे.

यंदा २५ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार इंटेल; आर्थिक संकटामुळे कर्मचारी कपात
नवी दिल्ली : चिप उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंटेल यंदा २५ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची माहिती आहे. इंटेल सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. एआय क्षेत्रात उभे राहण्यासाठी कंपनीला संघर्ष करावा लागत आहे. कंपनीचा आकार गरजेपेक्षा मोठा झाला आहे. त्यामुळे कर्मचारी कपात आवश्यक झाली आहे.
एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत इंटेलने १५ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. पुढील वर्षापर्यंत कंपनीची कर्मचारी संख्या कमी होऊन ७५ हजार इतकीच राहील. २०२४ च्या अखेरीस ती १,०८,९०० इतकी होती. कंपनीकडून यंदा एकूण सुमारे २५ टक्के कर्मचारी कपात केली जाणार आहे.
नुकसान व स्पर्धा
नुकतेच इंटेलने १.१२ लाख कोटी रुपयांच्या महसुलावर २५,१०७ कोटी रुपयांचे तिमाही नुकसान जाहीर केले. गेल्या ३५ वर्षांतील इंटेलच्या आर्थिक वाटचालीतील हे सर्वांत मोठे नुकसान आहे. कॉम्प्युटर चिप्समध्ये अग्रेसर इंटेल आता एआय क्षेत्रात एनव्हिडीया आणि एएमडी कंपन्यांच्या स्पर्धेत मागे पडली आहे.
मायक्रोसॉफ्टची कर्मचारी संख्या स्थिर : सत्य नडेला
एच-१बी व्हिसाद्वारे मायक्रोसॉफ्ट अमेरिकनांऐवजी विदेशी कर्मचारी भरत असल्याची टीका अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी केल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी आमच्या कंपनीतील कर्मचारी संख्या तुलनेने जैसे थे असल्याचे म्हटले आहे.
नडेला म्हणाले की, आमची कर्मचारी संख्या अपरिवर्तनीय आहे. आमच्याकडील काही गुणवत्ता व कौशल्ये यांची प्रशंसा केली जात आहे. त्याचवेळी आम्ही नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने अलीकडेच दोन हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला असून एआयच्या आगमनानंतर एकूण नऊ हजार लोकांना घरी पाठवले आहे.