'ट्रेन अपहरणात भारताचा हात', जगासमोर रडत होते पाकिस्तान; आता त्यांनाच उत्तर मिळालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:15 IST2025-03-14T11:13:21+5:302025-03-14T11:15:38+5:30
पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ही ट्रेन हायजॅक केली होती. यानंतर पाकिस्तानने भारतावर आरोप केले होते.

'ट्रेन अपहरणात भारताचा हात', जगासमोर रडत होते पाकिस्तान; आता त्यांनाच उत्तर मिळालं
दोन दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस हायजॅक केली. बलुचीस्तानच्या बंडखोरांनी ही ट्रेन हायजॅक केली होती. यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात आरोप केले होते. आता या आरोपाला भारताने प्रत्युत्तर दिले आहे.
सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांवर बोटे दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशाचे खापर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.
पाकिस्तानने आरोप काय केले होते?
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी गुरुवारी आरोप केले होते. ते म्हणाले होते की, जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यात सहभागी असलेले बंडखोर अफगाणिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांच्या संपर्कात होते. शफकत अली खान यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 'पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात भारताचा सहभाग आहे. जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यातही दहशतवादी अफगाणिस्तानातील त्यांच्या हँडलर्स आणि मास्टरमाइंडच्या संपर्कात होते.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध बऱ्याच काळापासून तणावपूर्ण आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला. काबूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
पाकिस्तानी सुरक्षा दलांनी फर एक्सप्रेसचे अपहरण करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सर्व ३३ बंडखोरांना ठार मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कराने या ऑपरेशनचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ जारी केलेले नाहीत.
बलुच बंडखोर संघटना बीएलएने पाकिस्तानी सैन्याचे दावे फेटाळून लावले. बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच म्हणाले, 'अनेक आघाड्यांवर अजूनही युद्ध सुरू आहे. पाकिस्तानी सैन्य ना युद्धभूमीवर जिंकू शकले, ना ते आपल्या ओलिस सैनिकांना वाचवू शकले आहे.