अमेरिकेतील भारतीय महिलांना हवी लवकर डिलिव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:26 IST2025-01-25T06:24:38+5:302025-01-25T06:26:03+5:30

United State News: अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Indian women in America want early delivery | अमेरिकेतील भारतीय महिलांना हवी लवकर डिलिव्हरी

अमेरिकेतील भारतीय महिलांना हवी लवकर डिलिव्हरी

वॉशिंग्टन  - अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ट्रम्प सरकारच्या या निर्णयाची अमेरिकेतील स्थलांतरित महिलांनी सर्वाधिक धास्ती घेतली आहे. २० फेब्रुवारीपासून हा आदेश लागू होत असल्याने त्यापूर्वीच प्रसूती करण्याची मागणी गर्भवती महिला करीत आहेत. सिझेरियनसाठी पुढाकार घेणाऱ्यांत  सर्वाधिक भारतीय महिला असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेत सध्या लाखो भारतीय राहत असून, त्यांना ट्रम्प निर्णयांची धास्ती आहे. (वृत्तसंस्था)

यामुळे भारतीयांमध्ये भीती..
आपण अनेक वर्षे अमेरिकेत राहू व येथे जन्मलेली मुले आपोआप अमेरिकन नागरिक होतील, अशी अपेक्षा भारतीयांना होती. मात्र, ट्रम्प यांच्या आदेशामुळे मुलांना अमेरिकन नागरिकत्व मिळण्याची दारे बंद होत आहेत. त्यामुळे भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्व काही मुलांच्या भविष्यासाठी...
ट्रम्प सरकारचा आदेश लागू झाल्यानंतर जन्मलेल्या मुला-मुलींना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे ट्रम्प सरकारचा हा आदेश अमेरिकेतील स्थलांतरित गर्भवती महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
आपल्या मुलांचे सुरक्षित भविष्य व त्यांना कुठल्याही परिस्थितीत अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे यासाठी स्थलांतरित महिलांमध्ये सी-सेक्शनचा ट्रेंड वाढला आहे.
सी-सेक्शनद्वारे मुलाला जन्म देण्यासाठी विनंती करणाऱ्यांमध्ये आठ व नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलांचा समावेश असल्याचा दावा न्यू जर्सी येथील डॉ. एस.डी. रामा यांनी केला. सात महिन्यांची गर्भवती महिला व तिचा पती वेळेपूर्वी प्रसूतीसाठी विनंती करीत होते. मार्चपूर्वी तिची प्रसूती करणे शक्य नसताना हे दाम्पत्य सी-सेक्शनद्वारे डिलिव्हरी करण्याची विनंती करीत असल्याचे डॉ. रामा यांनी सांगितले.  

सी-सेक्शन बाळ-मातेसाठी ठरते धोकादायक 
सी-सेक्शन बाळ व माता या दोघांसाठीही धोकादायक असल्याचे आम्ही वेळेपूर्वी प्रसूती करण्याची विनंती करणाऱ्या महिलांना सांगत आहोत, अशी माहिती टेक्सासच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एस.जी. मुक्काला यांनी दिली.
गत दोन दिवसांत १५ ते २० दाम्पत्य वेळेपूर्वी प्रसूती करण्यासाठी डॉ. मुक्काला यांच्याकडे आले होते. मात्र, अशी प्रसूती करणे अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी दाम्पत्यांना सांगितले. भारतीयांकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title: Indian women in America want early delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.