अमेरिकेतील विमान दुर्घटना; भारतीय महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:43 IST2025-02-01T13:42:53+5:302025-02-01T13:43:13+5:30
अपघातावेळी नियंत्रण कक्षात पुरेसे कर्मचारी नव्हते.

अमेरिकेतील विमान दुर्घटना; भारतीय महिलेचा मृत्यू
वॉशिंग्टन : अमेरिकेत रोनाल्ड रेगन विमानतळावर लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमान धडकून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ६७ प्रवाशांत असरा हुसेन रझा (२६) या भारतीय महिलेचा समावेश आहे.
या महिलेचे सासरे डॉ. हाशिम रझा यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. तिने २०२० मध्ये इंडियाना विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. डॉ. रझा यांचा मुलगा व असरा एकाच महाविद्यालयात शिकत होते. नंतर ऑगस्ट २०२३ मध्ये दोघांनी विवाह केला. वॉशिंग्टनमध्ये सल्लागार म्हणून काम करणारी असरा रुग्णालयांशी संबंधित एका प्रकल्पावर काम करीत होती. यासाठी तिला नेहमी विचिटाला जावे लागत असे.
... तो शेवटचा संदेश ठरला ...
असराने वॉशिंग्टनमध्ये उतरण्यापूर्वी एक मेसेज पतीला पाठवला. त्यानंतर 'आम्ही २० मिनिटांत उतरत आहोत', असे फोनवर सांगितले. तिचे हे शेवटचे शब्द ठरले. कारण, त्यानंतर काही मिनिटांतच विमान कोसळले.
दरम्यान, हा अपघात झाला तेव्हा विमानतळावर नियंत्रण कक्षात पुरेसे कर्मचारी नव्हते, असे तपासणी पथकाच्या अहवालात समोर आले आहे.