Indian Delegation in Russia: पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांचा दौरा करत आहेत. दरम्यान, आज एक शिष्टमंडळ रशियाला पोहोचले असता मोठी घटना घडली. विमान राजधानी मॉस्कोतील विमानतळावर उतरणार, तेवढ्यात या विमानतळावर युक्रनने ड्रोन हल्ला केला. यामुळे विमानाला बराचवेळ लँडिंग करता आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शिष्टमंडळात द्रमुक खासदार कनिमोळी, समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय, राजद खासदार प्रेमचंद गुप्ता, कॅप्टन ब्रिजेश, अशोक कुमार मित्तल आणि राजदूत मंजीव सिंह पुरी यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळाचे विमान आज मॉस्कोमध्ये दाखल होताच युक्रेनने विमानतळावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे मॉस्कोमधील सर्व विमानतळांवर विमानांची वाहतूक बंद करण्यात आली. रशियाच्या या निर्णयामुळे भारतीय शिष्टमंडळाच्या विमानाला बराचवेळ हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या. काही वेळानंतर हिरवा सिग्नल मिळताच विमान मॉस्कोमध्ये सुरक्षितरित्या लँड झाले. विमान उतरल्यानंतर मॉस्कोमधील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी सर्व खासदारांचे स्वागत केले.
यापूर्वी असे घडलेलेरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणात म्हटले होते की, जेव्हा जेव्हा एखाद्या देशातील सरकारी शिष्टमंडळ रशियाला भेट देते, तेव्हा युक्रेन मॉस्कोवर ड्रोन हल्ला करतो. पुतिन यांच्या मते, युक्रेन हे जाणूनबुजून करतोय. दरम्यान, या हल्ल्याबाबत अद्याप युक्रेनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.