Indian American appointed executive director of Bidens swearing in | जो बायडन यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय वंशाच्या नेत्याकडे

जो बायडन यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय वंशाच्या नेत्याकडे

ठळक मुद्देनव्या वर्षात २० जानेवारी रोजी होणार बायडन यांचा शपथविधीशपथविधी सोहळ्यासाठी चार सदस्यीय समितीची नियुक्तीभारतीय वंशाचे माजू वर्गीज करणार सोहळ्याचं नियोजन

वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बायडन आणि उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस यांच्या शपथविधीची तारीख निश्चित झाली आहे. नव्या वर्षात २० जानेवारी २०२१ रोजी बायडन यांचा शपथविधी पार पडणार आहे. शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जो बायडन यांनी 'प्रेसिडेंशिअल इनॉग्रल कमिटी'ची नियुक्ती केली आहे. या चार सदस्यीय समितीत भारतीय वंशाच्या माजू वर्गीज यांची निवड करण्यात आली आहे.

माजू वर्गीज हे वकील असून त्यांच्या जन्म अमेरिकेत झाला होता. वर्गीज यांचे आई-वडील केरळमधील तिरुवल्लामधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आलेल्या समितीत कार्यकारी संचालक माजू वर्गीज यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी अॅलन, उप कार्यकारी संचालक एरिन विल्सन आणि युवाना कॅन्सेला यांचा समावेश आहे. 

"अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याचं नियोजन करण्यासाठीच्या समितीचीमध्ये माझा समावेश होणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही अशा स्वरुपात शपथविधीचं आयोजन केलं जाईल. यासोबतच अमेरिकेचं सामर्थ्य दाखवून दिलं जाईल'', असं वर्गीज यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

"जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या ऐतिहासिक शपथविधीनंतर कोरोना विरोधात काम सुरू करणे आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी जोमाने कामाला सुरुवात होईल", असंही वर्गीज पुढे म्हणाले. माजू वर्गीज यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या प्रचार अभियानाचे मुख्य संयोजक म्हणून काम पाहिलं आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Indian American appointed executive director of Bidens swearing in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.