भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; PM मोदींनी सांगितले फायदे, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:14 IST2025-07-24T18:13:08+5:302025-07-24T18:14:36+5:30
भारतातील शेतकरी, मच्छीमार, एमएसएमई क्षेत्र, तरूण आणि विविध उद्योगांना या कराराचा थेट फायदा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; PM मोदींनी सांगितले फायदे, म्हणाले...
भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार (FTA) हा एक ऐतिहासिक करार आहे. हा करार म्हणजे, केवळ एक आर्थिक करार नसून दोन्ही देशांच्या सामायिक समृद्धीचा एक रोडमॅप आहे. भारतातील शेतकरी, मच्छीमार, एमएसएमई क्षेत्र, तरूण आणि विविध उद्योगांना या कराराचा थेट फायदा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भारतीय उत्पादनांना ब्रिटनमध्ये मोठी बाजारपेठ मिळेल -
पंतप्रधान मोदी म्हणाले, या करारानुसार भारतीय कापड, पादत्राणे, रत्ने व दागिने, समुद्री खाद्य आणि अभियांत्रिकी वस्तूंना ब्रिटनमध्ये चांगली बाजारपेठ मिळेल. याशिवाय, भारताच्या कृषी उत्पादनांसाठी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उद्योगांसाठीही ब्रिटनमध्ये नवीन संधी निर्माण होतील.
भारतीय ग्राहकांनाही वाजवी दरात ब्रिटिश उत्पादने मिळतील -
मोदी पुढे म्हणाले, "भारतीय नागरिकांना आणि उद्योग जगताला आता ब्रिटन निर्मित उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे अथवा साहित्य वाजवी आणि परवडणाऱ्या किमतीत मिळतील. यामुळे केवळ आरोग्य क्षेत्रच बळकट होणार नाही तर तंत्रज्ञान हस्तांतरण आणि नव्या उपक्रमांनाही चालना मिळेल.
ब्रिटिश पंतप्रधान म्हणाले, सर्वात महत्त्वाचा करार -
यासंदर्भात बोलताना, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले, युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर हा ब्रिटनचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आर्थिक व्यापार करार आहे. त्यांनी याला भारताच्या इतिहासातील सर्वात व्यापक करारांपैकी एक म्हटले आहे. तसेच, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची आणि व्यावहारिकतेची प्रशंसा केली आहे.