भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी बंद करावी; ट्रम्पनंतर आता अमेरिकेचे मंत्री बरळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 08:16 IST2025-03-08T08:16:12+5:302025-03-08T08:16:32+5:30
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये भारत-अमेरिका संबंधांवर चर्चा केली.

भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी बंद करावी; ट्रम्पनंतर आता अमेरिकेचे मंत्री बरळले
एकीकडे रशियाला युक्रेन युद्धात झुकते माप देणाऱ्या अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनकडून दुर्मिळ खनिजे धमक्या देत, जगसमोर भांडण करत अमेरिकेने आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. तसेच खुद्द ट्रम्प रशिया युक्रेनपेक्षा चांगला असल्याचा राग आळवत आहेत, तर दुसरीकडे अमेरिका भारताला रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करू नयेत असे सांगत आहे. अमेरिकेला आपली शस्त्रास्त्रे भारताला विकायची आहेत, यामुळे अमेरिकेच्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा याबाबत वक्तव्य केले आहे.
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये भारत-अमेरिका संबंधांवर चर्चा केली. ट्रम्प यांनी नुकतीच भारतावर जादाचे टेरिफ लादण्याची घोषणा केली होती. ब्रिक्स देशांनी प्रस्तावित केलेल्या पर्यायी चलनाबद्दल आणि रशियासोबतच्या भारताच्या संरक्षण व्यापाराबद्दल लटनिक यांनी चिंता व्यक्त केली.
अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची तयारी रशियाकडून सुरु आहे. डॉलरच्या ऐवजी अन्य सर्वमान्य चलन अस्तित्वात आणण्याचा विचार केला जात आहे. यामुळे लटनिक यांनी ब्रिक्समध्ये भारत हा 'I' आहे. ते जागतिक आर्थिक चलन म्हणून अमेरिकन डॉलरची जागा घेऊ शकेल असे चलन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या गोष्टी आम्हाला भारताविषयी जे वाटते, त्यामुळे प्रेम आणि स्नेह उत्पन्न करत नाहीत. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध न्याय्य असावेत आणि दोन्ही देशांतील मजबूत आणि प्रभावशाली भागीदारी निर्माण व्हावी, अशी इच्छा ट्रम्प ठेवत आहेत, असे म्हटले आहे.
भारताने आपल्या लष्करी शक्तीचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे आणि आम्हाला वाटते की ते संपवण्याची गरज आहे. अमेरिकन वस्तूंवर सर्वाधिक कर लादणाऱ्या देशांत भारतही आहे. भारतीय बाजारात अमेरिका येऊ शकेल आणि दोन्ही देश समान पातळीवर काम करू शकतील यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क कपात करावी लागेल, असे ते म्हणाले आहेत.
कृषी उत्पादनांवरील शुल्क कमी केल्याने मोदींना राजकीय नुकसान होणार नाही. यासाठी भारतीय बाजारपेठ खुली करावी लागेल. तुम्हाला हुशारीने व्यापार करावा लागेल. काही उत्पादनांवरील शुल्क कमी करून काम भागणार नाही, असे मतही लटनिक यांनी व्यक्त केले.