जम्मू - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून भारताच्या अनेक शहरात ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्याने S400 या एअर डिफेन्स यंत्रणेने हे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानची ८ मिसाईल उद्ध्वस्त केली. त्याशिवाय पाकिस्तानचे लढाऊ विमान JF17, F-16 याला भारताने प्रतिहल्ला करून जमिनीवर पाडले.
पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही आक्रमक पवित्रा घेत पाकच्या अनेक शहरांवर हल्ले केले. भारताने लाहोर, सियालकोट, कराची आणि पाकची राजधानी इस्लामाबादमध्येही गोळे फेकले. भारताने पाकिस्तानचे एअरबोर्न वॉर्निंग अँन्ड कंट्रोल सिस्टम उडवले. भारताने पाकच्या सर्व हल्ल्यांना जशास तसे उत्तर दिले. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता १० देशांसोबत भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चर्चा केली. पाककडून केलेल्या हल्ल्याला भारत उत्तर देणार अशी माहिती जयशंकर यांनी दिली आहे.
पाकिस्तानकडून होणारे हल्ले पाहता सीमाभागातील राज्यांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले होते. जम्मूच्या आरएसपुरा येथे सातत्याने सायरन वाजत होता. सध्या जम्मू शहरात मोबाईल नेटवर्क सुरू नाही. सतवारी कॅम्पमध्येही पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. कुपवाडा येथेही जोरदार गोळीबारी सुरू होती. पुंछ आणि राजौरीमध्येही पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावला. भारतीय वायू रक्षा तंत्रज्ञानाने अनेक महत्त्वाच्या शहरांवरील हल्ले अयशस्वी केले. पाकिस्तानी मिसाईल, ड्रोन यांना हवेतच उद्ध्वस्त करण्यात आले.
भारताने जम्मू ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानी भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिले. जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न केला गेला मात्र सीमा सुरक्षा दलाने हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये हल्ला केला. इस्लामाबादमधील पाकिस्तानी सैन्य प्रवक्ते जनरल अहमद शरीफ यांनी लाहोर, गुजरांवाला, चकवाल, बहावलपूर, मियानो, कराची, छोर, रावलपिंडी आणि अटक इथं भारतीय ड्रोनने हल्ला केल्याची पुष्टी केली.