अमेरिकेच्या सांगण्यावरून आम्ही ३ दशके डर्टी वर्क केले असं विधान करत पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादावर एकप्रकारे कबुली दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानी नेता बिलावल भुट्टोनेही त्याची री ओढली आहे. पाकिस्तानचा इतिहास आहे, पाकिस्तानात वाढणाऱ्या दहशतवाद्यांनीच माझ्या आईची हत्या केली. मी स्वत: दहशतवादाचा पीडित आहे असं बिलावल भुट्टोने म्हटलं आहे.
एका न्यूज चॅनेलच्या मुलाखतीत दहशतवादावर बोलताना बिलावल भुट्टोने सांगितले की, मला वाटत नाही हे काही रहस्य आहे, पाकिस्तानचा इतिहास राहिला आहे. त्याची आम्ही मोठी किंमत चुकवली आहे. कट्टरपंथी भूमिकेतून आम्ही धडा घेतला आहे. त्यातून अंतर्गत सुधारणाही केली आहे. आता हा सगळा इतिहास आहे. आम्ही आता दहशतवादात सहभागी नाही. देशाने खूप काही भोगले आहे असं त्यांनी म्हटलं.
ख्वाजा आसिफ यांनी काय म्हटलं होते?
पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीत आम्ही ३ दशकांपर्यंत अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी डर्टी वर्क केले असं विधान केले होते. ही आमची चूक होती, त्याची शिक्षा आम्ही भोगतोय असंही ख्वाजा आसिफ यांनी कबुली दिली होती. २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हा हल्ला लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला. या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानात आश्रय दिला जात आहे असा आरोप होतो.
दरम्यान, बिलावल भुट्टोकडून सातत्याने भारताविरोधात वक्तव्ये येत आहेत. पाकिस्तानला शांतता हवी परंतु जर भारताने आम्ही उकसवलं तर आम्ही युद्धासाठीही तयार आहोत. आम्हाला युद्ध नको परंतु जर कुणी आमच्या सिंधु नदीवर हल्ला केला तर त्याला सडेतोड उत्तर देऊ अशा पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.