पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. त्यात जगातील २ देश दहशतवादी पोसणाऱ्या पाकिस्तानसोबत उभे राहिले. मुस्लीम बहुल तुर्कीने पाकिस्तानची मदत करत त्याला सैन्यासह युद्ध साहित्यही दिले. याच तुर्कीत जेव्हा विनाशकारी भूंकप आला तेव्हा भारताने तातडीने मानवतेच्या दृष्टीने मदत पाठवली. भारताच्या मदतीनंतर तुर्कीनेही संकटात उभे राहिल्याबद्दल भारताचे आभार मानले परंतु भारत-पाकिस्तान युद्धावेळी तुर्की हे उपकार विसरून गेला.
तुर्कीने कायम पाकिस्तानला पाठिंबा दिला. मग ते राजनैतिक असो वा सैन्य कारवाईत..परंतु ही केवळ मैत्री नाही तर प्रत्यक्षात पाकिस्तानला मदत करण्यामागे तुर्कीचा खरा हेतू वेगळाच आहे. तुर्की गेल्या काही वर्षात त्यांच्याकडील संरक्षण उद्योगाला मजबूत करत आहे. तुर्की जगातील आघाडीच्या शस्त्र निर्यात देशांमध्ये पुढे येऊ पाहतोय. तुर्कीला शस्त्र निर्यातदार देश बनायचं आहे. पाकिस्तान ज्याचं सैन्य आणि संरक्षण यावर अवलंबून आहे तो तुर्कीसाठी ग्राहक आहे. पाकिस्तानसोबत तुर्कीने अनेक संरक्षण करार केलेत. ज्यात युद्धनौका, टी-१२९ अटॅक हेलिकॉप्टर, विविध ड्रोन यांचा समावेश आहे. या करारातून तुर्कीला संरक्षण उद्योगात अब्जावधी डॉलरचे उत्पन्न मिळते.
काय आहे प्लॅनिंग?
तुर्की पाकिस्तानला पाठिंबा केवळ मैत्रीसाठी नव्हे तर राजनैतिक गुंतवणुकीसाठी करतो. जागतिक पातळीवर पाकिस्तानचं समर्थन करून तुर्की एक मित्र म्हणून स्वत:ची प्रतिमा बनवत नाही तर त्याच्या शस्त्रांच्या बाजाराचं विस्तारीकरण करतोय. पाकिस्तानसोबत मजबुतीने उभे राहून तुर्कीच्या संरक्षण उद्योग कंपन्यांना नव्या व्यापाराची संधी मिळते. तुर्कीचा हेतू केवळ पाकिस्तानपुरता मर्यादित नाही. त्यांना जगभरात त्यांचे शस्त्र विकायचे आहेत. मिडल ईस्ट, आफ्रिका आणि आशियात तुर्की त्यांच्या संरक्षण उत्पादन वेगाने वाढवत आहे. पाकिस्तानसारख्या देशाची मदत करून त्यांना समर्थन देत तुर्की या बाजारात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
तुर्कीला शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या आणि विक्रीच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. तुर्की आता जगातील ११ वा सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश बनला आहे. आकडेवारीनुसार, २०१४-२०१८ च्या तुलनेने २०१९-२०२३ तुर्कीचा शस्त्रास्त्रे निर्यात व्यापार दुपट्टीने वाढला आहे. मालदिवनेही तुर्कीकडून टीबी २ ड्रोन खरेदी केलेत. सध्याच्या शस्त्रास्त्रे निर्यातदार देशांमध्ये सर्वात पुढे अमेरिका, फ्रान्स, रशिया, इटली, दक्षिण कोरिया, चीन, जर्मनी, ब्रिटन, स्पेन, इस्त्रायल यांचा समावेश आहे. या टॉप देशांनंतर तुर्कीचा ११ वा नंबर लागतो. तुर्कीने संयुक्त अरब अमीरातला सर्वात जास्त १५ टक्के शस्त्रे निर्यात केली आहेत.