India Pakistan News: पाकिस्तानकडून सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांना भारताने ९-१० मेच्या रात्री जबरदस्त उत्तर दिले. भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांसह शस्त्र गोदामावरही प्रहार केला. त्यावर भारतचं हल्ले करत असून, त्यांनी हल्ले थांबवले तर आम्हीही थांबवू, असा कांगावा पाकिस्तानचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
९ आणि १० मेच्या रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील काही लष्करी तळांना आणि एअर डिफेन्स सिस्टिमला तडाखा दिला. त्यानंतर इशाक डार यांनी पाकिस्तानातील जियो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केले आहे.
भारत थांबला तर आम्हीही थांबू
पाकिस्तानचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले, "भारताने आक्रमक घेणं थांबवायला हवे. जर भारत थांबला, तर आम्हीही थांबू. आम्ही युद्धाच्या बाजूने नाहीये. आम्हाला विनाकारण विध्वंस आणि पैशांची नासाडी नकोय."
इशाक डार असेही म्हणाले की, "पाकिस्तानने फक्त स्वःसंरक्षणासाठी ही पावले उचलली आहेत. अशावेळी भारत थांबला तर परिस्थिती गोष्टी पुन्हा सुधरू शकतात. कारण पाकिस्तानकडूनही हल्ला केला जाणार नाही."
अण्वस्त्र देखरेख समितीची बैठक नाही
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एनसीए अर्थात नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावल्याचे वृत्त समोर आले होते. हे वृत्त पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी फेटाळून लावले आहे.
नॅशनल कमांड अथॉरिटीबद्दलच्या बैठकीबद्दल पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, अशी कोणतीही बैठक सध्या होणार नाहीये.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने एनसीएची २००० मध्ये स्थापना कऱण्यात आली होती. एनसीएचे इस्लामाबाद मुख्यालय असून, पाकिस्तानातील संरक्षण आणि अण्वस्त्र धोरणाबद्दल महत्त्वाची भूमिका या संस्थेची आहे.