भारतासहपाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आहे, ज्यामुळे सुरक्षेची चिंता वाढली आहे. भारतातील गुरुदासपूर, पठाणकोट आणि तरनतारन सारख्या जिल्ह्यांपासून ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतापर्यंत, नद्यांना पूर आला आहे. धुसी धरण फुटल्यामुळे आणि करतारपूर कॉरिडॉरभोवती पाणी साचल्याने अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत.
दोन्ही बाजूंचे हजारो लोक बेघर झाले आहेत आणि त्यांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे. मान्सूनच्या पावसामुळे भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही बाजूंची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वाघा बॉर्डरवरील फोटोंमध्ये, संपूर्ण परिसर पाण्यात बुडालेला दिसत आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांचीही चिंता वाढली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
अनेक गावं पाण्याखाली
पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात रावी नदीच्या जलप्रवाहामुळे डेरा बाबा नानक येथील श्री करतारपूर कॉरिडॉर दर्शन स्थळ येथे बांधलेलं धुसी धरण फुटलं. त्यानंतर संपूर्ण परिसरात पाणी शिरलं आणि अनेक गावं पाण्याखाली गेली. धुसी धरण फुटल्यामुळे हजारो एकर शेतजमीनही पाण्याखाली गेली आहे. डेरा बाबा नानक शहरातील घरं पाण्याखाली गेली आहेत आणि लोक प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहेत. विध्वंसाची स्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे.
सीमेलगतच्या भागांची परिस्थिती आणखी बिकट
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, २,१०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. तिथे पुरामुळे गावं पाण्याखाली जात आहेत आणि पावसामुळे जलद वाहणारं पाणी भारतीय बॉर्डरकडे येत आहे, ज्यामुळे सीमेलगतच्या भागांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. करतारपूर कॉरिडॉरच्या पुलाखालून जलद प्रवाहात वाहणारे पाणी दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी धोक्याचं आहे.