India-Pakistan Ceasefire :भारताच्याऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानच्या पोकळ आणि खोट्या दाव्यांवर ऑस्ट्रेलियन लष्करी तज्ज्ञ टॉम कूपर यांनी शाहबाज शरीफ सरकारला आरसा दाखवला आहे. त्यांनी 3-4 दिवस चाललेल्या या कारवाईचे वर्णन भारताचा विजय म्हणून केले. तसेच, पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्यामुळेच त्यांनी युद्धविरामाचे आवाहन केल्याचा दावा केला.
टॉम कूपर हे जगातील प्रतिष्ठित युद्ध इतिहासकारांपैकी एक आहेत. ते मध्य पूर्व ते दक्षिण आशियापर्यंतच्या हवाई युद्धाचे विश्लेषक, लेखक आणि तज्ज्ञ आहेत. 6 आणि 7 मे च्या रात्री पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतानेही या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. टॉम कूपर यांनी या आठवडाभर चाललेल्या घटनाक्रमावर एक ब्लॉग लिहिला आहे.
टॉम कूपर यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्यासमोर टिकू शकत नाही. भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानात घुसून कारवाई केली, त्यावरुन पाकिस्तानचा पराभव दिसून येतो. या कारणास्तव, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे आवाहन करण्यासाठी अमेरिकेशी संपर्क साधला होता. कूपर यांनी याला भारताचा स्पष्ट विजय म्हटले आहे.
टॉम कूपर आपल्या ब्लॉगमध्ये पुढे लिहितात, मी नेहमीप्रमाणे स्पष्ट सांगतो. जेव्हा एक बाजू दुसऱ्याच्या अण्वस्त्रांच्या डेपोवर हल्ले करते आणि दुसरी बाजू काहीही करण्याच्या स्थितीत नसते, तेव्हा माझ्या मते हा एक स्पष्ट विजय आहे. पाकिस्तानने युद्धविरामाचे आवाहन करणे आश्चर्यकारक नाही.
टॉम कूपरच्या मते, ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान पाच मुख्य दहशतवादी आणि इतर 140 दहशतवादी मारले गेले. पाकिस्तान सरकारने मौन बाळगले, परंतु आयएसआयने या दहशतवाद्यांना शहीद घोषित केले आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांसह त्यांना राज्य सन्मान दिला. हे दहशतवाद्यांचा लष्कराशी थेट संबंध असल्याचे सांगण्यासाठी पुरेसे आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची भारताची कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली आणि पाकिस्तान अपयशी ठरला. भारताने केवळ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला नाही, तर पाकिस्तानचे हल्ले देखील प्रभावीपणे रोखले. याशिवाय, भारताने रावळपिंडी आणि कराची सारख्या पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये बसवलेली हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 देखील नष्ट केली आणि शेवटी पाकिस्तान मागे पडला, असेही कूपर यांनी म्हटले.