"भारत तटस्थ नाही, आम्ही...!" ट्रम्प यांच्यासमोर रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर PM मोदी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 06:20 IST2025-02-14T06:14:21+5:302025-02-14T06:20:51+5:30
Narendra Modi-Donald Trump Meeting : पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भातील भारताची भूमिका पुन्हा एकदा विश्वपटलावर ठेवली...

"भारत तटस्थ नाही, आम्ही...!" ट्रम्प यांच्यासमोर रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर PM मोदी स्पष्टच बोलले
PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज व्हाइट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास भेट झाली. दरम्यान या दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भातील भारताची भूमिका पुन्हा एकदा विश्वपटलावर ठेवली. तसेच, "अनेकांना वाटते की, भारत 'तटस्थ' आहे. मात्र, मी स्पष्ट करू इच्छितो की, भारत तटस्थ नाही. आमचाही आपला एक पक्ष आहे आणि आमचा पक्ष आहे 'शांतता'. कारण, हा युद्धाचा काळ नाही. युद्धाच्या मैदानावर समस्या सूटत नाहीत," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपल्याला माहीतच आहे की, मी रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांच्या संपर्कात होतो. मी स्वतः दोन्ही देशांना भेटीही दिल्या आहेत. अनेकांना असे वाटते की भारत 'तटस्थ' आहे. मात्र, मी स्पष्ट करू इच्छितो की, भारत तटस्थ नाही. आमचाही आपला एक पक्ष आहे आणि आमचा पक्ष आहे 'शांतता'."
युद्धाच्या मैदानावर समस्या सूटत नाहीत -
मोदी पुढे म्हणाले, "मी आमच्या याच एका सिद्धांतावर बोलताना, राष्ट्रपती पुतीन यांच्या उपस्थितीत माध्यमांसमोर स्पष्टपणे म्हणालो होतो की, हा युद्धाचा काळ नाही. आजही माझा दृढ विश्वास आहे की, युद्धाच्या मैदानावर समस्या सूटत नाहीत. त्या चर्चेच्या टेबलावरच सुटतात. भारताचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, दोन्ही पक्षाचे लोक उपस्थित असतील, अशा फोरममध्ये चर्चा झाल्यानंतरच काही मार्ग निघेल. राष्ट्रपती ट्रम्प जो प्रयत्न करत आहेत, मी त्याचे स्वागत करतो, समर्थन करतो आणि माझी इच्छा आहे की, राष्ट्रपती ट्रम्प या प्रयत्नांत लवकरात लवकर यशस्वी व्हावेत आणि जगात शांततेचे मार्ग खुले व्हावेत."
PM मोदीही म्हणाले, 'एक और एक 11' -
भारत-अमेरिकेच्या भागिदारी संदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "भारत आणि अमेरिकेच्या भागिदारीने मानवतेला मोठा लाभ होईल. ट्रम्प आम्हाला मेक अमेरिका ग्रेट अगेनची आठवण करून देतात. याच पद्धतीने 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवणे 1.4 अब्ज भारतीयांची आकांक्षा आणि संकल्प आहे. आपल्या भेटीचा अर्थ 'एक और एक 11' आहे. जो मानवतेसाठी एकत्रितपणे काम करेल."