वॉशिंग्टन : भारतानेरशियाकडून सुरू केलेल्या तेलखरेदीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भडकले असताना आता त्यांचे समर्थक मंत्रीही यात उतरले आहेत. वाणिज्य मंत्री पीटर नवारो यांनी या मुद्द्यावर ‘एक्स’वर पोस्ट करताना भारत तेल खरेदीतून नफा कमावत रशियाचे युक्रेनविरुद्ध वॉर मशीन चालवत असल्याचे म्हटले होते. यावर ‘एक्स’ने फॅक्ट चेक जोडत हा मुद्दा खोडून काढला. यामुळे तेलाचा हा मुद्दा आता नवारो आणि टेस्लाचे सर्वेसर्वा व ‘एक्स’ची मालकी असलेल्या इलॉन मस्क यांच्यात पेटला आहे.
काय म्हणाले होते नवारो?
भारत तेल खरेदी करून नफा कमावत युक्रेनविरुद्ध रशियाचे वॉर मशीन चालवत आहे. याचा फटका अमेरिकेला बसत असून अमेरिकी करदात्यांना याची किंमत द्यावी लागत आहे, असे नवारो यांनी म्हटले होते.
फॅक्ट चेक नोट म्हणजे वेडेपणा, नवारो भडकले
‘एक्स’ने भारताचे समर्थन केल्यानंतर भडकलेले मंत्री नवारो थेट इलॉन मस्क यांच्यावर संतापले. नवी पोस्ट करीत ते म्हणाले, ‘इलॉन मस्क चुकीची माहिती देत आहेत. फॅक्ट चेक नोट म्हणजे तद्दन वेडेपणा आहे. पूर्वी भारत रशियाकडून तेल खरेदी करीत नव्हता. युक्रेनच्या लोकांचे जीव घेणे बंद करा.’
‘भारत एक-दोन महिन्यांत माफी मागेल’
भारताला रशियाकडून तेलखरेदी बंद करायची नाही, ‘ब्रिक्स’ देशांनाही धरून ठेवायचे व बाजारपेठही खुली करायची नाही. मग, ५० टक्के टॅरिफ त्यांना सहन करावाच लागेल, अशी दर्पोक्ती अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी केली. एक-दोन महिन्यांत भारत माफी मागेल, असा दावाही त्यांनी केला.
भारत सरकारचे लॉबिस्ट जेसन मिलर-ट्रम्प भेट
भारताने नियुक्त केलेले अमेरिकी राजकीय लॉबिस्ट जेसन मिलर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. लैंगिक शोषणासारखे आरोप व इतर वादामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले नसले तरी ट्रम्प यांचे ते विश्वासू राहिले.
२०२० मध्ये त्यांनी ‘एसएचडब्ल्यू पार्टनर्स एलएलसी’ स्थापना करून अमेरिकी सरकार व इतर देशांसाठी लॉबिंग सुरू केली. भारताने एप्रिल २०२५ मध्ये १५ कोटींत अधिकृत करार करून त्यांची नियुक्ती केली आहे.
भारत वस्तूंवर अधिक शुल्क आकारून अमेरिकेतील नोकऱ्यांवर गदा आणत आहे. तेलखरेदीतून युद्धपोषण होते. याचा फटका अमेरिकी करदात्यांना बसत आहे, असे नवारो यांनी म्हटले होते.