भारतीय सैन्यदलाच्या 'ऑपरेशन त्रिशूल'ला सुरूवात! सीमेजवळील एकत्रित सरावाने पाकिस्तान हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:08 IST2025-10-30T16:07:08+5:302025-10-30T16:08:03+5:30
India vs Pakistan, Operation Trishul: भारत पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यास सज्ज असल्याचा संयुक्त सरावातून पाकिस्तानला संदेश

भारतीय सैन्यदलाच्या 'ऑपरेशन त्रिशूल'ला सुरूवात! सीमेजवळील एकत्रित सरावाने पाकिस्तान हादरला
India vs Pakistan, Operation Trishul: भारताने गुरुवारी पाकिस्तान सीमेजवळ आपला सर्वात मोठा 'त्रिशूल' नावाचा संयुक्त लष्करी सराव सुरू केला. हा त्रिसेना म्हणजेच लष्कर, नौदल आणि हवाई दल असा तिन्ही दलाचा सराव १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ३ नोव्हेंबरपासून या सरावाला गती मिळणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सहा महिन्यांनी होणारा हा भारताचा पहिला मोठा लष्करी सराव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या सरावाचा उद्देश पाकिस्तानला स्पष्ट संदेश देणे आहे की भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे तयार आहे आणि आवश्यक असल्यास ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू करण्यासही सज्ज आहे.
सराव कुठे होत आहे?
त्रिशूल हा सराव गुजरात आणि राजस्थानमध्ये आयोजित केला गेलेला आहे. यात मुख्य लक्ष कच्छ प्रदेशावर आहे, जो पाकिस्तानसोबतच्या तणावाचा एक नवीन बिंदू म्हणून पाहिला जात आहे. अलिकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता की जर त्यांनी गुजरातच्या सर क्रीक प्रदेशात भारतीय भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तर भारताची कारवाई अशी असेल की पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलेल. त्यांनी म्हटले होते की, पाकिस्तानने सर क्रीक परिसरात नवीन लष्करी चौक्या, बंकर, रडार आणि ड्रोन लाँच बेस (FOB) बांधले आहेत, ज्यावर भारताचे बारकाईने लक्ष आहे.
'त्रिशूल'मध्ये भारताच्या सैन्यसामर्थ्यांची झलक
या सरावात तिन्ही सैन्यातील सर्वात प्रगत शस्त्रे आणि कमांडो युनिट्स सहभागी होत आहेत. लष्कराचे टी-९० युद्ध रणगाडे, ब्राह्मोस क्षेपणास्त्र युनिट्स आणि आकाश हवाई संरक्षण प्रणालीचा समावेश आहे. हवाई दलाची राफेल आणि सुखोई-३० सारखी लढाऊ विमाने, तसेच सी गार्डियन आणि हेरॉन ड्रोन समाविष्ट आहे. तर नौदलाचे कोलकाता-वर्ग विध्वंसक, निलगिरी-वर्ग फ्रिगेट्स आणि जलद हल्ला जहाजे यात आहेत. याशिवाय, भारतीय लष्कराचे पॅरा एसएफ, नौदलाचे मरीन कमांडो युनिट(MARCOS) आणि हवाई दलाचे गरुड कमांडो फोर्स देखील या सरावात सहभागी होत आहेत.
पाकिस्तान हादरला...
भारताच्या या प्रचंड लष्करी प्रात्यक्षिकामुळे इस्लामाबादमध्ये खळबळ उडाली आहे. सराव सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचे अनेक भाग बंद केले. पाकिस्तानच्या विमान वाहतूक प्राधिकरणाने मध्य आणि दक्षिण हवाई मार्गांवर ४८ तासांची उड्डाण बंदी लादून एक NOTAM (नोटिस टू एअरमेन) जारी केला. तसेच, भारताचा सराव सुरू होताच, पाकिस्तानने जवळजवळ संपूर्ण हवाई क्षेत्र प्रतिबंधित केले, ज्यावरून हे स्पष्ट झाले की पाकिस्तान हादरला आहे.