India-America Relation:भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालरशिया दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते रशियन सरकारच्या वरिष्ठ रणनीतीकारांची भेट घेतील. डोवाल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनाही भेटू शकतात. रशियाकडून कच्चे तेल केल्यामुळे भारतावर शुल्क लादणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना यामुळे नक्कीच मोठा धक्का बसणार आहे. रशियन वृत्तसंस्था TASS नुसार, अजित डोवाल रशियन नेत्यांशी धोरणात्मक भागीदारी आणि परस्पर संबंध सुधारण्यावर चर्चा करतील.
डोवाल यांचा महत्वपूर्ण दौरासध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे भारतावर संतापले आहेत. त्यांनी भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नये, अन्यथा जास्तीचा दंड आकारला जाईल, असा इशारा दिला आहे. यासोबतच त्यांनी रशियाला युक्रेन युद्धात लवकरच युद्धविराम जाहीर करण्याचा सल्ला दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, जर रशियाने युद्धविराम केली नाही, तर अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादेल. आता अजित डोवाल यांचा रशिया दौरा अशा तणावपूर्ण वातावरणात होत आहे.
जयशंकरदेखील रशियाला जणारडोवाल यांचा हा दौरा पूर्वनियोजित असला तरी, सध्याच्या वातावरणामुळे या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रशियन वृत्तसंस्था TASS नुसार, भारत आणि रशियामधील संरक्षण सहकार्यावर या दौऱ्याचा भर असेल. तसेच, सध्याच्या भू-राजकीय तणावावरही चर्चा होईल. याशिवाय, भारताला रशियन तेलाचा पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचाही त्यात समावेश असेल. मॉस्को टाईम्सच्या वृत्तानुसार, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हेदेखील या महिन्याच्या अखेरीस रशियाला भेट देणार आहेत.
भारताने अमेरिकेला दाखवला आरसाअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करुन रशियाला युक्रेनविरोधात युद्ध सुरू ठेवण्यास मदत करत आहे. यासोबतच त्यांनी भारतावर २५ टक्के कर लादण्याची घोषणाही केली आहे. मात्र, ट्रम्प यांच्या आरोपांवर भारताने अमेरिकेला आरसा दाखवला आणि म्हटले की, अमेरिका स्वतः रशियासोबत भरघोस व्यवसाय करत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणे भारताला आपल्या राष्ट्रीय हितांचे आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे.
S-400 वर देखील चर्चा शक्य द इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, या भेटीत अजित डोवाल संरक्षण करारावर देखील चर्चा करू शकतात. भारताकडून S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची पुढील खरेदी, त्याची देखभाल या चर्चेच्या अजेंड्यात सामील असेल. ऑक्टोबर २०१८ मध्ये भारताने रशियाकडून ५ S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा करार केला होता. त्यापैकी भारताला 3 मिळाल्या असून, उर्वरित दोन S-400 स्क्वॉड्रनची डिलिव्हरीला वेळ लागतोय. ताज्या माहितीनुसार, त्यांची डिलिव्हरी ऑगस्ट 2026 पर्यंत होऊ शकते.