भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:05 IST2025-10-24T14:04:16+5:302025-10-24T14:05:41+5:30
क्रेमलिनच्या ऊर्जा उत्पन्नावर आणखी निर्बंध घालण्याच्या उद्देशाने अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यां, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर नवीन निर्बंध लादले आहेत. दरम्यान, आता व्हाईट हाऊसने यावर प्रतिक्रिया दिली.

भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाच्या तेल खरेदीवरून दबाव आणला आहे. भारताने रशियाकडून तेल करणे थांबवणार नसल्याचे दावा केला होता. दरम्यान, आता भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचा दावा व्हाईट हाऊसने पुन्हा एकदा केला आहे. त्यांचे ऊर्जा धोरण केवळ राष्ट्रीय हित आणि ग्राहक संरक्षणावर आधारित आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकार परिषदेत याबाबत विधान केले. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या दिशेने प्रगती न झाल्याने अध्यक्ष ट्रम्प निराश असल्याचे त्यांनी सांगितले. रशियन तेल कंपन्यांवरील निर्बंधांचा एक नवीन टप्पा मॉस्कोच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देईल, असा विश्वास व्यक्त केला.
"जर तुम्ही निर्बंध वाचले आणि त्यांचे काळजीपूर्वक परीक्षण केले तर तुम्हाला दिसेल की ते बरेच कठोर आहेत. मी आज सकाळी काही आंतरराष्ट्रीय बातम्या पाहिल्या की चीन रशियाकडून तेल खरेदी कमी करत आहे. भारताने राष्ट्रपतींच्या विनंतीवरून असेच केले आहे. राष्ट्रपतींनी आमच्या सहयोगी युरोपियन देशांना, रशियन तेल खरेदी थांबवण्याचे आवाहन देखील केले आहे, असंही लेविट म्हणाले.
रशियाच्या तेलाबद्दल अमेरिकेचा नवा दावा
अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर नवीन निर्बंध लादले आहेत, या निर्बंधाचा उद्देश क्रेमलिनच्या ऊर्जा उत्पन्नावर आणखी मर्यादा घालणे आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसने यावर प्रतिक्रिया दिली. "हा निश्चितच दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि काल अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे हे निर्बंध हानिकारक असतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही सांगण्यात आले आहे.
या वर्षाच्या अखेरीस दोन्ही नेत्यांची भेट अपेक्षित होती, परंतु मॉस्कोने अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावाला नकार दिल्यानंतर ही बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.