Inauguration of Kartarpur Corridor, Sikh devotees in Pakistan | कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन, शीख भाविक पाकिस्तानात
कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन, शीख भाविक पाकिस्तानात

डेरा बाबा नानक : गुरूनानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त शीख भाविकांच्या सोयीसाठी बांधलेल्या कर्तारपूर कॉरिडॉरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी उद््घाटन झाले. कर्तारपूर येथे जाणाऱ्या ५०० भारतीय शिखांच्या पहिल्या तुकडीला पंतप्रधानांनी निरोप दिला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आदी मान्यवरांचा पहिल्या तुकडीत समावेश आहे.
पंजाबमधील डेरा बाबा नानक ते पाकिस्तानच्या कर्तारपूर येथील गुरूद्वारा दरबार साहिबपर्यंत हा कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. भारतातून कर्तारपूरला गेलेल्या शीख भाविकांच्या पहिल्या तुकडीचे नेतृत्व अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीतसिंग करत आहेत. १२ नोव्हेंबर रोजी गुरूनानक यांची ५५०वी जयंती आहे.
पंतप्रधानांनी सुल्तानपूर लोधी येथे बेरसाहिब गुरुद्वाराला भेट दिली. त्यांच्यासोबत पंजाबचे राज्यपाल, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, केंद्रीय मंत्री हरसिरमत कौर बादल हेही उपस्थित होते. या गुरूद्वाराच्या ठिकाणी गुरूनानक यांनी १४ वर्षे वास्तव्य केले होते. (वृत्तसंस्था)
>मतभेद संपुष्टात यावेत
कर्तारपूरला रवाना झालेल्या भारतीय शीख भाविकांच्या पहिल्या तुकडीने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. त्या तुकडीत सहभागी असलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, भारत व पाकिस्तानमध्ये अनेक मतभेद आहेत. कर्तारपूर कॉरिडॉरची दोन्ही देशांनी संयुक्तरीत्या उभारणी केली आहे. हा प्रकल्प दोन्ही देशांतील मतभेद संपुष्टात आणण्याच्या प्रक्रियेची सुरुवात ठरावी.

Web Title: Inauguration of Kartarpur Corridor, Sikh devotees in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.