"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:58 IST2025-11-21T14:57:57+5:302025-11-21T14:58:44+5:30
Maria Corina Machado News: यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं वितरण १० डिसेंबर रोजी नॉर्वेमधील ओस्लो येथील सिटी हॉलमध्ये होणार आहे.

"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी
यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं वितरण १० डिसेंबर रोजी नॉर्वेमधील ओस्लो येथील सिटी हॉलमध्ये होणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नॉर्वेमध्ये जाण्याची इच्छा मारिया यांनी व्यक्त केली आहे. मात्र व्हेनेझुएलाच्या अटॉर्नी जनरल यांनी मारिया यांना एक गंभीर धमकी दिली आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी परदेशात गेल्यास अनेक खटल्यांचा सामना करत असलेल्या मारिया यांना फरार घोषित केलं जाईल, अशा इशारा देण्यात आला आहे.
मारिया कोरिना मचाडो ह्या व्हेनेझुएलामधील मानवाधिकारांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. सरकारने त्यांच्याविरोधात अनेक गुन्हेगारी खटले दाखल केले आहेत. त्यामध्ये दहशतवादाशी संबंधित आरोपाचाही समावेश आहे.
मी व्हेनेझुएलामध्ये लपून छपून राहत आहे, असे ५८ वर्षीय मचाडो यांनी सांगितले होते. तसेच १० डिसेंबर रोजी होणाऱ्या नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. मात्र व्हेनेझुएलाचे अटॉर्नी जनरल तारेक विल्यम साब यांनी मारिया यांना सक्त शब्दात इशारा दिला आहे. मारिया ह्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी परदेशात गेल्यास त्यांना फरार घोषित केलं जाईल, अशी धमकी त्यांनी दिली आहे.