'युद्धातून जिवंत परतलो तर...'; इस्रायल रिझर्व्ह फोर्सने बोलविले, दोन सैनिकांनी लग्न उरकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 12:25 IST2023-10-11T12:24:53+5:302023-10-11T12:25:15+5:30
हमासच्या हल्ल्यानंतर युद्धाची घोषणा करताना इस्रायलने ताबडतोब जवळपास साडे तीन लाख रिझर्व्ह सैनिकांना बोलविले आहे.

'युद्धातून जिवंत परतलो तर...'; इस्रायल रिझर्व्ह फोर्सने बोलविले, दोन सैनिकांनी लग्न उरकले
गेल्या शनिवारी हमासने इस्रायलवर रॉकेटचा अक्षरश: वर्षाव केला. यामध्ये आतापर्यंत १००० इस्रायलींचा मृत्यू झाला आहे. तर २४०० हून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायलनेही गाझा पट्टीला उध्वस्त करण्याचा विडा उचलला असून विमाने, रणगाडे आणि लाखोंचे सैन्य पाठविण्यास सुरुवात केली आहे. तिकडे अमेरिकेने देखील विमाने भरून शस्त्रास्त्रे पाठविण्यास सुरुवात केली आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर युद्धाची घोषणा करताना इस्रायलने ताबडतोब जवळपास साडे तीन लाख रिझर्व्ह सैनिकांना बोलविले आहे. ४८ तासांत हे सैनिक आपापल्या ठिकाण्यांवर पोहोचले असून सुट्टीवर गेलेल्या सैनिकांनाही परत बोलविण्यात आले आहे. सर्वांसाठीच ही वेळ बाका असली तरी एका सैनिक जोडप्याने वेळ कमी असल्याने लग्न उरकून टाकले आहे.
सोमवारी या दोघांना रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले होते. यामुळे त्यांनी रविवारी रात्रीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. असे छोटेखानी आणि कमी वेळात लग्न करण्याचा विचारही केला नव्हता, असे या दोघांनी सांगितले. एलिनॉर जोसेफिन आणि उरी मिंट्झर हे दोघेही थायलंडमध्ये होते. तेव्हा त्यांना बोलविण्यात आले. या दोघांनी घरी पोहोचून लग्न केले.
युद्धातून सुरक्षित परत आलो तर मोठी पार्टी करू, नाहीतर एकत्र मरण पत्करू, असे या दोघांनी विवाहानंतर सांगितले आहे. सहसा या गोष्टी आता घडत नाहीत. इतिहासात असे बरेच किस्से आहेत. भारतीय लष्करातही आहेत. परंतू, युद्धावर जाण्यापूर्वी महिला आणि पुरुष सैनिकाने लग्न केल्याचे फार कमी ऐकिवात आहे.