"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 00:29 IST2025-07-27T00:27:25+5:302025-07-27T00:29:04+5:30
Donald Trump News: थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये एक प्राचीन मंदिर आणि सीमारेषेवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबोडिया आणि थायलंडच्या प्रमुखांशी फोन करून संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याबाबत चर्चा केली आहे.

"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
आग्नेय आशियातील थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये एक प्राचीन मंदिर आणि सीमारेषेवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. यादरम्यान, दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबोडिया आणि थायलंडच्या प्रमुखांशी फोन करून संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याबाबत चर्चा केली आहे. या युद्धामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे हा संघर्ष थांबवला पाहिजे. हे युद्ध मला भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षाची आठवण करून देत आहे. तो संघर्ष यशस्वीरीत्या थांबवण्यात आला होता, असा दावाही ट्रम्प यांनी केला.
याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर या संदर्भात माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, थायलंडसोबत सुरू असलेलं युद्ध थांबावं यासाठी मी आताच कंबोडियांच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. योगायोगाने आम्ही सध्या या दोन्ही देशांसोबत व्यापार कराराबाबत चर्चा करत आहोत. मात्र जर ते युद्ध करत राहिले तर आम्ही त्यांच्यापैकी कुणाशीही व्यापार करार करणार नाही. तसेच मी याबाबत दोन्ही देशांना स्पष्टच सांगितले आहे. कंबोडियासोबतची चर्चा पूर्ण झाली आहे. तसेच मी या गुंतागुंतीच्या परिस्थितीला सुलभ बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, मी थायलंडच्या काळजीवाहू पंतप्रधानांसोबतही चर्चा केली आहे. तसेच ही चर्चा सकारात्मक झाली आहे. कंबोडियाप्रमाणेच थायलंडलाही तातडीने शांतता आणि युद्धविराम हवा आहे. आता मी हा संदेश कंबोडियाच्या पंतप्रधानांकडे पोहोचवणार आहे. दोन्ही देशांसोबत चर्चा केल्यानंतर युद्धविराम, शांतता आणि समृद्धी हा एक स्वाभाविक मार्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात आपण याबाबत खूप काही पाहणार आहोत, असेही ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, जेव्हा सारं काही सुरळीत होईल आणि शांतता प्रस्थापित होईल तेव्हा मी या दोन्ही देशांसोबत व्यापारी कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने पुढे जाण्यास उत्साहित आहे.