"मी २०२४ ची निवडणूक हरलो तर शेअर बाजार कोसळेल", डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 20:00 IST2024-01-15T20:00:38+5:302024-01-15T20:00:49+5:30
Donald Trump: अमेरिकेमध्ये यावेळी राष्ट्राध्यक्ष निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पार्टीकडून माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरणार आहेत. त्याबरोबरच ट्रम्प हे आपल्या विजयाबाबतही निश्चिंत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्र्म्प यांनी मोठा दावा केला आहे.

"मी २०२४ ची निवडणूक हरलो तर शेअर बाजार कोसळेल", डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
अमेरिकेमध्ये यावेळी राष्ट्राध्यक्ष निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पार्टीकडून माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरणार आहेत. त्याबरोबरच ट्रम्प हे आपल्या विजयाबाबतही निश्चिंत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्र्म्प यांनी मोठा दावा केला आहे. २०२४ च्या निवडणुकीत माझा विजय झाला नाही तर त्याचे परिणाम शेअर बाजारावर होतील.
आयोवा फॉक्स न्यूज टाऊन हॉलमध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, माझ्या मते अमेरिकेमध्ये स्टॉक मार्केट सोडून अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट आहे. दरम्यान, स्टॉक मार्केटच्या सुस्थितीचं श्रेयही ट्रम्प हे निवडणुकीच्या प्रचारात आपण राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर घेतलेला आघाडीला देतात.सध्या बाजारामध्ये जी तेजी दिसून येत आहे ती केवळ मी निवडणुकीत आघाडी घेतल्याने दिसत आहे, असं ट्रम्प सांगतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत आपल्याला विजय न झाल्यास मोठं संकट येण्याची भविष्यवाणीही केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत विजय मिळण्याची खात्री असलेल्या ट्रम्प यांनी सांगितले की, जर मी २०२४ ची निवडणूक जिंकली नाही तर स्टॉक मार्केट क्रॅश होईल. तसेच पुढच्या १२ महिन्यांच्या आत देशाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी या कार्यक्रमात सहभागी होताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. जेव्हा त्यांना शेअर बाजारामधील तेजी आणि १२ महिन्यांमधील आर्थिक मंदीबाबत केलेल्या भविष्यवाणीबाबत विचारले असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी कुठल्याही दुर्घटनेची अपेक्षा करत नाही आहे, मात्र मी अर्थव्यवस्थेच्या नाजूक स्थितीबाबत आपली चिंता व्यक्त केलेली आहे.