पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच बलूचिस्तानातही पाकिस्तानविरोधात आग पेटली आहे. याठिकाणी बलूच आर्मीकडून सातत्याने पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा जवानांना टार्गेट केले जात आहे. बलूचिस्तान स्वतंत्र करावे या मागणीसाठी इथल्या बंडखोर गटाने पाकविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यात पाकिस्तानी सैन्य अनेक पातळीवर मागे पडताना दिसत आहे. बंडखोरांनी अनेक सरकारी संस्थांना आग लावली आहे. भारतासोबतच्या तणावात अडकलेल्या पाकिस्तानला हा दुहेरी मार सहन करावा लागत आहे.
बलूचिस्तान पाकसाठी का महत्त्वाचे?
बलूचिस्तान हे पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जर बलूचिस्तान पाकपासून वेगळा झाला तर त्याला किती मोठे नुकसान होईल याचा अंदाज पाकिस्तानला आहे. पाकिस्तानात सोने, तांबे भांडार संपुष्टात येईल. बलूचिस्तान प्रांतात ५.९ बिलियन टन खनिज, सोने आणि तांबे यांच्या खाणी आहेत. जे पाकिस्तानला आर्थिक जोखिमेत टाकू शकते.
किती मोठी आहे बलूचिस्तानची इकॉनॉमी?
बलूचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेपासून जवळ बलूचिस्तान क्षेत्र पाकिस्तानसाठी राजनैतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. बलूचिस्तानात सोने, तांबे, नैसर्गिक गॅससारखी अनेक खनिजे आहेत जे पाकिस्तानसाठी आर्थिक फायद्याचे आहे. परंतु जर हा प्रांत पाकिस्तानपासून वेगळा झाला तर देशात गंभीर आर्थिक, ऊर्जा आणि सुरक्षा संकटाचा सामना करावा लागू शकतो. बलूचिस्तानचे क्षेत्रफळ पाकिस्तानच्या एकूण ४४ टक्के आहे. इथली लोकसंख्या १४.९ मिलियन आहे. देशाचं ऊर्जा संकट दूर करण्यासाठी इथल्या नैसर्गिक गॅसची भूमिका महत्त्वाची आहे. या भागात जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. त्याशिवाय तांबेही अधिक प्रमाणात सापडते.
बलूचिस्तान सांभाळणे पाकसाठी मोठं आव्हान
बलूचिस्तान पाकपासून वेगळा झाल्यास सुरक्षा आणि राजनैतिक आव्हान निर्माण करणारे असेल. इराण, अफगाणिस्तानच्या जवळ असल्याने हा भाग पाकिस्तानसाठी एक गड म्हणून काम करतो. त्याशिवाय चीन-पाकिस्तानी भागीदारीमुळे चीनही या भागात सक्रीय आहे. जर बलूचिस्तान वेगळा झाला तर पाकिस्तानची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. पाकिस्तानातील ७० टक्के उत्पादन बलूचिस्तानात होते. पाकिस्तानातील ९०% चेरी, द्राक्षे आणि बदाम, ६०% जर्दाळू, पीच आणि डाळिंब, ७०% खजूर आणि ३४% सफरचंद येथे उत्पादित केले जातात. एकट्या मकरान भागात दरवर्षी सुमारे ४,२५,००० टन खजूर उत्पादन होते. त्यामुळे या भागाची इकॉनॉमी पाकच्या अर्थव्यवस्थेला किती फटका लावू शकते याचा अंदाज घेता येईल.