अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे महत्वाची बैठक होणार आहे. मात्र, यापूर्वीच ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने, भारतावर लादलेला टॅरीफमुळे मॉस्कोच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसेल. एवढेच नाही तर, भारत हा रशियाचा दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी पुतीन यांच्यावर निशाणा साधताना ट्रम्प म्हणाले, ''जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रशियाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या तेल खरेदीदाराला इशारा देतो की, आपण रशियाकडून तेल खरेदी केले, तर 50 टक्के टॅरिफ लागेल, तेव्हा हा निश्चितपणे त्यांच्यासाठी एक मोठा झटका असतो." एवढेच नाही तर, यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल, असा दावाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे.
अलास्कामध्ये होणार ट्रम्प-पुतीन भेट - न्युयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, पुतिन आणि ट्रम्प यांच्यात पुढील आठवड्यात अलास्का येथे बैठक होणार आहे. या बैठकीसंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, "त्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे? हे मला बघायचे आहे. मला सुरुवातीच्या दोन मिनिटांतच समजेल, वाटाघाटी होऊ शकतात की नाही. यानंतर, कदाचित मी शुभेच्छा देऊन निघून जाईन."ट्रम्प यांनी भारतावर लादला 50 टक्के टॅरिफ? -अमेरिकेने यापूर्वी भारतावर २५ टक्के टॅरीफ लादला होता. मात्र, नंतर तो वाढवून ५० टक्के करण्यात आला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होणार आहे. मात्र, यावरही सहमती होऊ शकलेली नाही. भारताने दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी क्षेत्रासंदर्भात करार करावा, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. मात्र, भारत यासाठी तयार नाही.