अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीचे श्रेय, सातत्याने स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यासंदर्भातील त्यांचे दावे भारताने नेहमीच फेटाळून लावले आहेत. यातच आता, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी थेट अमेरिकेच्या भूमीवरूनच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चोख उत्तर दिले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या निमंत्रणावरून एस जयशंकर ३० जून ते २ जुलै दरम्यान अमेरिका दौऱ्यावर आहेत. दरम्यान, न्यूजवीकला दिलेल्या एका मुलाखतीत एस जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या दाव्यांची पोल-खोल केली. अमेरिकेच्या सांगण्यावरून भारताने युद्धविरामासंदर्भात सहमती दर्शवली नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो - एस जयशंकरजयशंकर म्हणाले, "अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी 9 मेच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली, तेव्हा मी त्याच रूममध्ये होतो. जेडी वेन्स म्हणाले होते, जर आम्ही काही गोष्टी ऐकल्या नाही, तर पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करेल. यावर, पंतप्रधान मोदी यांनी, आमच्याकडूनही उत्तर दिले जाईल, असा संकेत दिला होता. यानंतर, सकाळच्या सुमारास अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी फोन केला आणि म्हणाले, पाकिस्तानी चर्चेसाठी तयार आहेत."
दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानलाही फटकारलं -परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ला हा, काश्मीरमधील पर्यटन संपवण्याच्या उद्देशाने केलेले, आर्थिक युद्धाचे एक नवे कृत्य होते. एवढेच नाही तर, पाकिस्तानचे अण्वस्त्र ब्लॅकमेलिंग धोरण, भारताला पाकिस्तानी दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यापासून रोखू शकणार नाही. हे भारताने हे स्पष्ट केले आहे, असेही जयशंकर म्हणाले.