रशियाला जी-7 मध्ये बघू इच्छितो, बाहेर करणे एक चूक होती...! ट्रम्प यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 02:47 IST2025-02-14T02:46:38+5:302025-02-14T02:47:36+5:30
"रशियाला पुन्हा जी 7 मध्ये बघायला आपल्याला आवडेल," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

रशियाला जी-7 मध्ये बघू इच्छितो, बाहेर करणे एक चूक होती...! ट्रम्प यांचं मोठं विधान
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वॉशिंग्टन डीसी येथे बैठक होणार आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतरची ही दोन्ही नेत्यांची पहिलीच भेट आहे. व्हाईट हाऊसमध्ये होत असलेल्या या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. महत्वाचे म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर अनेक महत्त्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी रशियासंदर्भात मोठे विधान केले आहे. "रशियाला पुन्हा जी 7 मध्ये बघायला आपल्याला आवडेल," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
पत्रकारांसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले, "आपण रशियाला पुन्हा G7 मध्ये बघू इच्छितो. यामुळे, रशियाला पुन्हा जी-7 मध्ये आणायला आपल्याला आवडेल. रशियाला जी7 मधून बाहेर करणे एक चूक होती." मॉस्कोच्या क्रिमियावरील हल्ल्यानंतर, २०१४ मध्ये रशियाला बाहेर करण्यात आले होते. दरम्यान, रशियाला पुन्हा सामील होण्याची परवानगी द्यायला हवी, असे ट्रम्प यांनी वारंवार म्हटले आहे.
ब्रिक्स देशांना 100 टक्के टॅरिफची धमकी -
ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना 100 टक्के टॅरीफची धमकी दिली आहे. व्हाइट हाऊस येथे पत्रकारांसोबत बोलताना, "ब्रिक्स देश 'डॉलरसोबत खेळले तर' त्यांना 100 टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल."
परस्पर शुल्क लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी -
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्यापारी भागीदारांकडून होणाऱ्या आयातीवर परस्पर शुल्क लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. याचा अर्थ अमेरिकेत कुठल्याही देशाच्या आयात वस्तूवर तेवढाच कर लावला जाईल, जेवढा संबंधित देशात अमेरिकन वस्तूच्या आयातीवर लावला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात घोषणा केली. विशेष म्हणजे भारतात जवळजवळ इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक कर आहे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.