न्यूयॉर्क - मी जगभरातील सात युद्धे थांबवली. त्यापैकी चार युद्धे टॅरिफ लावून थांबवली, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये म्हटले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते.
ट्रम्प म्हणाले की, मी भारतपाकिस्तानमधील युद्धही थांबवले. दोघांमधील संघर्ष अणुयुद्धात रूपांतरित होण्याच्या जवळ आला होता. दोन्ही देश एकमेकांचे लढाऊ विमान पाडत होते. त्या वेळी मी हस्तक्षेप केला. याशिवाय, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ७ लढाऊ विमाने पाडल्याचा दावाही केला. १९ जुलै रोजी ५ लढाऊ विमाने पाडल्याच्या त्यांनी दावा केला होता. मात्र ही विमाने कोणाची पाडली हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
ट्रम्प म्हणाले की अमेरिकेने टॅरिफमधून ट्रिलियन डॉलर्स कमावले आणि त्याच रणनीतीने युद्धे थांबवली. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स म्हणाले की, भारतावर लादलेला टॅरिफ अमेरिकेच्या धोरणांचा एक भाग आहे. ट्रम्प प्रशासन भारतावर कर लादण्यासह उपाययोजनांद्वारे रशियाला तेल अर्थव्यवस्थेतून नफा मिळवणे कठीण करत आहे. ट्रम्प प्रशासनाने जास्त आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असे व्हान्स म्हणाले.