"भारतात दलितांची स्थिती पाकिस्तानपेक्षा उत्तम, मला १ कोटीची स्कॉलरशीप"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 09:41 AM2023-03-25T09:41:29+5:302023-03-25T09:55:49+5:30

रोहिणी यांनी संयुक्त राष्ट्रात एएनआयच्या प्रतिनिधींशीं संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

"I got a scholarship of 1 crore, the condition of Dalits in India is better than in Pakistan", Says rohini ghawari in UN | "भारतात दलितांची स्थिती पाकिस्तानपेक्षा उत्तम, मला १ कोटीची स्कॉलरशीप"

"भारतात दलितांची स्थिती पाकिस्तानपेक्षा उत्तम, मला १ कोटीची स्कॉलरशीप"

googlenewsNext

नवी दिल्ली - भारत सरकारच्या स्कॉलरशीपवर स्विट्झरलँडमधील जिनेव्हा येथे पीएचडी करणाऱ्या भारताच्या इंदौर शहरातील एका सफाई कामगाराच्या मुलीने संयुक्त राष्ट्रात देशाचं प्रतिनिधित्व केलं. येथील मानवाधिकर परिषदेच्या ५२ व्या सत्रामध्ये रोहिणी घावरीने येथे भारताची बदलाचं कौतुक करताना देश लोकशाहीचं प्रतिनिधित्त्व करत असल्यानेच देशाच्या राष्ट्रपतीपदी एक आदिवासी महिला तर देशाच्या पंतप्रधानपदी एक ओबीसी व्यक्ती बसल्याचं त्यांनी म्हटलं. तर, मी एका सफाई कर्मचाऱ्याची मुलगी असूनही १ करोड रुपयांच्या स्कॉलरशीपमुळेच इथपर्यंत पोहोचले, असेही रोहिणी यांनी म्हटलं.

रोहिणी यांनी संयुक्त राष्ट्रात एएनआयच्या प्रतिनिधींशीं संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व करणे हे माझं स्वप्न होतं, गेल्या २ वर्षांपासून मी जेनेव्हा येथे पीएचडी करत आहे. भारतात दलित समुदायाच्या असलेल्या परिस्थितीबद्दल जागरुकता करणे हा माझा उद्देश होता, असेही रोहिणी यांनी म्हटलं. 

एक मुलगी असल्याने इथपर्यंत पोहोचणे ही कठीण बाब आहे, मात्र, एक दलित मुलगी असतानाही इथपर्यंत मी पोहचू शकले, याचा मला अभिमान आहे. भारतात दलितांची परिस्थिती पाकिस्तान आणि इतर मागास देशांच्या तुलनेत चांगली आहे. आमच्याकडे दलितांसाठी आरक्षण पद्धती आहे. म्हणूनच, मला भारत सरकारकडून १ कोटी रुपयांची स्कॉलरशीप मिळाली, ज्यामुळे मी इथे पोहोचले, हेच याचे उत्तम उदाहरण आहे. निश्चितच भारतात गेल्या ७५ वर्षांत दलितांमध्ये मोठा बदल घडला आहे. अल्पसंख्यांक समाजातील लोकांना देशाच्या प्रमुखपदी संधी मिळते अशी उदाहरण कमी देशात आहेत, त्यात भारत एक आहे. भारतात राहणारी दलित व्यक्ती हावर्ड आणि ऑक्सफर्डमध्ये जाऊ शकते, देशाचे पंतप्रधानपद किंवा राष्ट्रपतीपद भूषवू शकते, असेही रोहिणी घावरी यांनी म्हटलं. 

दरम्यान, काही देश आणि स्वयंसेवी संस्था संयुक्त राष्ट्रात भारताची प्रतिमा खराब करण्याचं काम करत आहेत. प्रत्येक देशात सकारात्मक आणि नकारात्मक बाजू असतात. भारतात जातीभेद आहे, पण त्यातील सकारात्मकतेचं उदाहरण मी आहे, असेही रोहिणी यांनी एएनआयशी बोलताना म्हटले. 

 

Web Title: "I got a scholarship of 1 crore, the condition of Dalits in India is better than in Pakistan", Says rohini ghawari in UN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.