आयफोनने केला घोळ, नववर्षाच्या शुभेच्छा देणं 'त्यांना' महागात पडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 12:26 IST2019-01-05T12:17:24+5:302019-01-05T12:26:11+5:30
नववर्षाच्या शुभेच्छा देणं दोन कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. आयफोनवरून शुभेच्छा दिल्यामुळे चीनमधील कंपनीने दोन कर्मचाऱ्यांना दंड ठोठावला आहे.

आयफोनने केला घोळ, नववर्षाच्या शुभेच्छा देणं 'त्यांना' महागात पडलं!
बीजिंग - सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. 2019 हे वर्ष सर्वांना सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो असा शुभेच्छांचा वर्षाव ही झाला. मात्र नववर्षाच्या शुभेच्छा देणं दोन कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. आयफोनवरून शुभेच्छा दिल्यामुळे चीनमधील कंपनीने दोन कर्मचाऱ्यांना दंड ठोठावला आहे.
चीनमधील huawei या सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने कर्मचाऱ्यांना ही शिक्षा केली आहे. कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारं ट्वीट केलं होतं. मात्र त्यांनी हे ट्वीट करताना आयफोनचा वापर केला. आयफोन निर्माण करणारी अॅपल ही huawei कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी आहे. त्यामुळेच दोन कर्मचाऱ्यांना याबाबत दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या महिन्याच्या पगारातून तब्बल 730 डॉलर कापून घेतले जाणार आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेले ट्वीट हे आयफोनद्वारे केल्याचं समोर आल्यानंतर huawei कडून ने ते ट्वीट लगेचच डिलीट करण्यात आलं. मात्र, तो पर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या.