Howdy Modi: मोदींच्या आगमनाआधी 'त्या' घोषणांनी दुमदुमलं संपूर्ण स्टेडियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 22:30 IST2019-09-22T22:29:03+5:302019-09-22T22:30:32+5:30
हाऊडी मोदी कार्यक्रमाला 50 हजार अनिवासी भारतीय उपस्थित

Howdy Modi: मोदींच्या आगमनाआधी 'त्या' घोषणांनी दुमदुमलं संपूर्ण स्टेडियम
ह्युस्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ह्युस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अमेरिकेत राहणाऱ्या 50 हजार भारतीयांना मोदी संबोधित करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारत आणि अमेरिकेतील संबंधांच्या दृष्टीनं हाऊडी मोदी कार्यक्रमाला अतिशय महत्त्व आहे.
ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनिवासी भारतीयांनी मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. याशिवाय अनेकांनी प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत राम मंदिराचाही उल्लेख केला. हाऊडी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी 'एक ही नारा एक ही नाम... जय श्रीराम... जय श्रीराम...', 'राम लला हम आएंगे... मंदिर वहीं बनाएंगे...', अशा घोषणा दिल्या.
एनआरजी स्टेडियममध्ये मोदी आणि ट्रम्प यांचं आगमन होण्यापूर्वी ढोल-नगाडे वाजवण्यात आले. याशिवाय नृत्यांचं आयोजनदेखील करण्यात आलं होतं. हाऊडी मोदी कार्यक्रमाला अनिवासी भारतीय पारंपारिक भारतीय वेशभूषेत उपस्थित आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी मोदी सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी ट्विटरवर त्यांचे प्रोफाईल पिक्चर बदलले आहेत. अनेकांनी 'हाऊडी मोदी' प्रोफाईल पिक्चर ठेवला आहे.