कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 17:52 IST2025-05-11T17:48:05+5:302025-05-11T17:52:16+5:30
पाकिस्तान आर्थिक स्थिती वाईट असतानाही, सातत्याने लढाऊ विमाने, ड्रोन, पाणबुड्या आणि युद्धनौका खरेदी करत असतो...

कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानात यांच्यात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला होता. यावर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यानंतर, पाकिस्ताननेही ड्रोन आणि मिसाइलच्या सहाय्याने हल्ले केले. मात्र भारताने ते हवेतल्या हवेतच नष्ट केले. एवढेच नाही तर भारताने पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टिमही उद्धवस्त केले. यातच आता प्रश्न असा निर्माण होतो की, कर्जाच्या खाईत गेलेल्या पाकिस्तानकडे लष्करी ड्रोन, बॉम्ब, लढाऊ विमाने आदी खरेदी करण्यासाठी पैसा येतो कुठूण? तर जाणून घेऊयात...
पाकिस्तान आर्थिक स्थिती वाईट असतानाही, सातत्याने लढाऊ विमाने, ड्रोन, पाणबुड्या आणि युद्धनौका खरेदी करत असतो. पाकिस्तानचा जीडीपी अंदाजे २३६ अब्ज डॉलर एवढा आहे. या वर्षात ते केवळ संरक्षणावरच ७ अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक खर्च करण्याची योजना आखत आहे.
सैन्याजवळ पैसा येतो कुठून?-
शस्त्रास्त्रे खरेदीसंदर्भात पाकिस्तानचे नियम वेगळे आहेत. चीन पाकिस्तानला ८०% हून अधिक शस्त्रास्त्रे पुरवतो. चीन केवळ शस्त्रास्त्रेच पुरवत नाही, तर तो ती खरेदी करण्यासाठी पैसाही देतो. हे पैसे कमी व्याजदराने, सोप्या अटींवर आणि दीर्घ कालावधीसाठी दिले जातात.
याशिवाय, पाकिस्तानी सैन्याचे स्वतःचे एक मोठे व्यावसायिक साम्राज्यही आहे. पाकिस्तानी लष्कर शेती, सिमेंट कारखाने, इन्व्हेस्टमेंट काउंसील आणि गृहनिर्माण प्रकल्प अस्या विविध उपक्रमांत कार्यरत आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य सरकारी बजेटवर अवलंबून राहत नाही. स्वतःच पैसे कमवते, खर्च करते आणि शस्त्रांस्त्रांची खरेदी करते.
जगातील अनेक देशांकडून मिळाले आहे कर्ज -
पाकिस्तानने अनेक देशांकडून कर्ज घेतले आहे. १९४८ पासून, एकट्या अमेरिकेनेच पाकिस्तानला ४० अब्ज डॉलर्सची आर्थिक आणि लष्करी मदत केली आहे. कॅनडा, ब्रिटन आणि युरोपचा विचार करता हा आकडा ५५ अब्ज डॉलरहून अधिक होतो. याशिवाय, दोनच दिवसांपूर्वी, आयएमएफने पाकिस्तानला २.४ अब्ज डॉलर्सची नवीन मदत दिली. यापैकी १ अब्ज डॉलर्स ईएफएफ अंतर्गत आणि १.४ अब्ज डॉलर्स आरएसएफ अंतर्गत देण्यात आले आहेत. ईएफएफचे उद्दिष्ट पाकिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर करणे आहे. हे ७ अब्ज डॉलर्सच्या पॅकेजचा एक भाग आहे जो ३७ महिने चालेल. हवामान बदलाचा सामना करणे हे आरएसएफचे उद्दिष्ट आहे.