अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचं मूल्यमापन कसं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 17:14 IST2020-09-05T17:09:05+5:302020-09-05T17:14:08+5:30
अमेरिकेत येऊ इच्छिणारा व्यक्ती संपूर्ण शैक्षणिक वर्षाचं शुल्क आणि राहण्याचा खर्च करू शकतो का, याची पडताळणी केली जाते.

अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचं मूल्यमापन कसं होतं?
प्रश्न- अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचं मूल्यमापन दूतावासातील अधिकारी कसं करतात?
उत्तर- शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या संपूर्ण वर्षाचं शुल्क भरण्याची आर्थिक क्षमता असल्याची कागदपत्रं अर्जदाराला दूतावासातील अधिकाऱ्यांना द्यावी लागतात. याशिवाय पुढील वर्षाचं शुल्क भरण्याची आपली योजनादेखील अर्जदाराला अधिकाऱ्यांना सांगावी लागते. यासाठी कोणतीही एक योजना असू शकत नाही. अर्जदारानुसार योजना बदलते. प्रत्येक अर्जदाराची योजना वेगळी असू शकते.
व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला संपूर्ण शैक्षणिक शुल्क कसं भरणार याची संपूर्ण माहिती फॉर्म-२० (नॉनइमिग्रंट स्टुडंट स्टेटस पात्रतेसाठीचं प्रमाणपत्र) मध्ये द्यावी लागते. संपूर्ण खर्चात शैक्षणिक शुल्कासह राहण्याच्या आणि खाण्याच्या खर्चाचा समावेश असतो.
अर्जदाराच्या आर्थिक योजनेत विविध स्त्रोतांचा समावेश असू शकतो. मात्र त्यात केवळ वैयक्तिक बचत, शिष्यवृत्ती, फेलोशिप, सार्वजनिक किंवा खासगी कर्ज, भारतात, अमेरिकेत किंवा अन्यत्र राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा समावेश असू नये. प्रत्येक अर्जदाराची आर्थिक योजना वेगळी असते. दूतावासातील अधिकारी केवळ विशिष्ट योजना पाहत नाहीत. अर्जदाराकडे पहिल्या शैक्षणिक वर्षाच्या खर्चासाठी पुरेसं आर्थिक पाठबळ आहे, याची खातरजमा अधिकाऱ्यांकडून केली जाते.
शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अनधिकृत रोजगाराचा वापर करू नका. अभ्यासक्रम व्यवहारिक प्रशिक्षण (सीपीटी) किंवा पर्यायी व्यवहारिक प्रशिक्षण (ओपीटी) विद्यार्थ्यांच्या आर्थिक योजनेचा भाग असू शकतं. मात्र पहिलं शैक्षणिक वर्ष पूर्ण केल्याशिवाय विद्यार्थी सीपीटी किंवा ओपीटीसाठी पात्र ठरू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या मर्यादित कामाच्या संधींचा विचार पहिल्या शैक्षणिक वर्षाचं शुल्क भरण्यासाठी केला जात नाही. बोगस शैक्षणिक केंद्रं आणि आर्थिक संस्थांपासून सावध राहा, असं आवाहन आम्ही करतो.
अमेरिकेची व्हिसा अर्ज प्रक्रिया कागदपत्रांवर नव्हे, तर मुलाखतीवर अवलंबून असते. अर्जदारांना त्यांची आर्थिक योजना संक्षिप्तपणे थोडक्यात सांगता यायला हवी. विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च पालक करणार असल्यास ते तो खर्च नेमका कसा करणार आहेत, याची माहिती विद्यार्थ्याला देता यायला हवी. त्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. स्टुडंट व्हिसा मुलाखतीसाठी केवळ वैध पासपोर्ट, डीएस-१६० (व्हिसा अर्ज) कन्फर्मेशन पेज, वैध आणि स्वाक्षरी असलेला आय-२० अर्ज आणि सेविस फी पेमेंटचा पुरावा लागतो. अधिकाऱ्यांना अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता वाटल्यास ते अर्जदाराकडे मुलाखतीनंतर त्याची मागणी करू शकतात.
व्हिसासंबंधीच्या दैनंदिन कामांसाठी सध्या दूतावास बंद आहे, याची नोंद घ्या. तो कधी सुरू होणार याची माहिती आम्ही आमच्या संकेतस्थळावर देऊ. तुम्हाला अधिक प्रश्न असल्यास ते india@ustraveldocs.com वर मेल करा.