अमेरिकेच्या जाळ्यात कसा अडकला ड्रॅगन...? ट्रम्प यांनी चीनवर लादला 125 टक्के टॅरिफ, भारतासह 75 देशांना दिला मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:44 IST2025-04-10T09:43:31+5:302025-04-10T09:44:31+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर चीनविरुद्ध १२५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे...

अमेरिकेच्या जाळ्यात कसा अडकला ड्रॅगन...? ट्रम्प यांनी चीनवर लादला 125 टक्के टॅरिफ, भारतासह 75 देशांना दिला मोठा दिलासा
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्द चांगलेच पेटले आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनवर १०४ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. यानंतर चीननेही आक्रमक भूमिका घेत अमेरिकेवर प्रत्त्युत्तरात ८४ टक्के टॅरिफ लादले. खरे तर, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे जाळे फेकले आहे, ज्यात चीन अडकताना दिसत आहे. आता अमेरिकेने चीनच्या प्रत्येक वस्तूवर 125 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर 75 देशांवर लादण्यात आलेले टॅरिफ पुढील 90 दिवसांसाठी रोखण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर चीनविरुद्ध १२५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणानुसार, जर एखाद्या देशाने अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ लादला, तर अमेरिकाही त्याच प्रमाणात टॅरिफ लादेल. मात्र, आता याचा सर्वाधिक फटका चीनला बसत आहे.
आता अमेरिकेला लुटण्याची वेळ संपली : ट्रम्प -
चीनवर अमेरिकन बाजारपेठेचे शोषण केल्याचा आरोप करत ट्रम्प म्हणाले, "आता अमेरिकेची लूट करण्याचा काळ संपला, हे चीनला समजावण्याची वेळ आली आहे." ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी ७५ देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लादले होते. मात्र, आता त्यांनी याला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. कारण या देशांनी कोणतीही स्वरुपाचे प्रत्युत्तरात्मक पाऊल उचलले नाही आणि टॅरिफच्या मुद्यावर अमेरिकेशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. महत्वाचे म्हणजे, भारतासह जगातील ५० देशांनी टॅरिफसंदर्भात चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही अमेरिकेने म्हटले होते.
अमेरिका-चीन व्यापार युद्ध -
ट्रम्प यांच्या धोरणावरून स्पष्ट होते की, अमेरिकेचा मुख्य विरोधक चीन आहे. एकीकडे चीन स्वतःला जागतिक नेता म्हणून सादर करत असतानाच, दुसरीकडे ट्रम्प त्याला एकाकी पाडण्याची खेळी खेळताना दिसत आहेत. अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लादल्याने चीनकडून स्वस्त वस्तूंचा पुरवठा थांबेल. चिनी वस्तू महाग होतील. याचा चीनच्या निर्यात अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल.