मालक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बेडवर होता; अचानक पिटबुलने झाडली बंदुकीची गोळी, जांघेला घासून गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 08:24 IST2025-03-12T08:24:22+5:302025-03-12T08:24:44+5:30
अमेरिकेत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्याच्या पाळलेल्या कुत्र्याने चुकून त्याला गोळी मारल्याचा दावा त्याने केला.

मालक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बेडवर होता; अचानक पिटबुलने झाडली बंदुकीची गोळी, जांघेला घासून गेली
अमेरिकेत एक विचित्र घटना घडली आहे. गर्लफ्रेंडसोबत बेडवर झोपलेल्या व्यक्तीला त्याच्या पिटबुल जातीच्या कुत्र्याने गोळी मारली आहे. हा दावा आश्चर्यकारक असल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
अमेरिकेत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्याच्या पाळलेल्या कुत्र्याने चुकून त्याला गोळी मारल्याचा दावा त्याने केला. सुरुवातीला पोलिसांनाही ही भंकस वाटली. गेराल्ड किर्कवुड याच्यासोबत ही घटना घडली आहे. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बेडवर झोपला होता. तेव्हा त्याचा ओरिओ नावाच्या कुत्र्याने अचानक बेडवर उडी मारली. तेव्हा त्याचा पंजा लोड असलेल्या बंदुकीच्या ट्रिगरमध्ये अडकला. यामुळे गोळी सुटल्याचा दावा त्याने केला आहे.
बंदुकीतून सुटलेली गोळी किर्कवुडच्या जांघेला घासून गेली. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनी किर्कवुडला हॉस्पिटलला हलविले आहे. त्याच्या जखमेवर उपचार करण्यात आले आहेत. पोलिसांनाही आधी वेगळा संशय आला होता. कुत्रा कसा काय गोळी झाडू शकतो, असे म्हणत पोलिसही विचार करू लागले होते. परंतू, किर्कवुडच्या गर्लफ्रेंडनेही त्याचे समर्थन केले. या घटनेनंतर पुढे आणखी काही घडू नये म्हणून आपण लगेचच ती बंदूक लपविली, असेही तिने सांगितले.
पोलिसांनी या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुढील तपास सुरु केला आहे. किर्कवुडवर कोणता गुन्हा दाखल करायचा की नाही यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही. परंतू एकंदरीतच झालेला प्रकार हा खूप विचित्र असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बंदूकीशी खेळताना, किंवा तिची साफसफाई करताना अशा घटना आधी घडलेल्या आहेत. परंतू, एखाद्या प्राण्यामुळे बंदुकीतून गोळी सुटल्याचे विरळच घडलेले आहे.